महाराष्ट्राच्या राजकारणातील आज मोठी बातमी समोर आली आहे. आनंद परांजपे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे तब्बल 14 वर्षांनी आनंद परांजपे हे स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. 2012 ची परिस्थिती आणि आजची राजकीय परिस्थिती या दरम्यानच्या काळात राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. यानंतर आता ठाण्याच्या राजकारणात नवं समीकरण बघायला मिळण्याची शक्यता आहे. हे समीकरण नेमकं कुणाच्या पथ्यावर पडणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर एकनाथ शिंदे यांचं हे बेरजेचं राजकारण ठरणार आहे.
आनंद परांजपे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी 2012 मध्ये पहिल्यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. आनंद परांजपे हे तिसऱ्यांदा राजकीय पक्षांतर करणार आहेत. विशेष म्हणजे ते आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेत त्यांचं राजकीय पुनर्वसन नेमकं कसं केलं जाणार? ते पाहणं आता महत्त्वाचं होणार आहे. आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर तब्बल 14 वर्षांचं वर्तुळ पूर्ण होणार आहे.
आनंद परांजपे यांनी 2012 मध्ये शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. विशेष म्हणजे तोपर्यंत ते दोनवेळा शिवसेनेचे खासदार म्हणून जनतेतून निवडून आले होते. त्यांचे वडील प्रकाश परांजपे हे सलग चार वेळा ठाण्याचे खासदार म्हणून निवडून आले होते. प्रकाश परांजपे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे निकटवर्तीय होते. प्रकाश परांजपे यांचं 2008 मध्ये निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर ठाणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यावेळी रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी आनंद परांजपे यांचा विजय झाला होता. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला होता. पण नंतर पक्षांतर्गत गटबाजीमुळे आनंद परांजपे हे शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
आनंद परांजपे यांनी अतिशय नाट्यमयरित्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या सभेत आनंद परांजपे भावूक झाले होते. त्यानी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर नारजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत त्यांचा सामना हा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात झाला होता. या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून आनंद परांजपे यांना पुन्हा आमदार आणि खासदार होता आलेलं नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून खूप चोखपणे जबाबदारी पार पाडत होते. पण त्यांनी अचानक काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हापासून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं.
आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा का दिला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटल्यानंतर आनंद परांजपे यांनी अजित पवार गटाची बाजू भक्कमपणे मांडत पक्षाला मजबुती देण्याचे काम केले. परांजपे हे शिवसेनेचे खासदार असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला होता. तेव्हापासून परांजपे हे आव्हाड यांच्यासोबत होते. त्यांना दोनदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर ठाणे जिल्हा अध्यक्ष, प्रवक्ते म्हणून जबाबदारी असताना परांजपे यांनी अचानक जितेंद्र आव्हाड यांची साथ सोडली आणि अजित पवार गटाची जबाबदारी सांभाळली. त्यावेळी परांजपे यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. मात्र त्यांच्या नावाचा विचार न करता इतर कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. हा प्रकार दोनदा घडल्याने परांजपे नाराज झाले होते.
आता पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय कार्यकारणीतून बाहेर ठेवण्यात आल्याची चर्चा, त्यातून पक्षातील फुटीची चर्चा रंगली आहे. अखेर आनंद परांजपे यांनी पक्षाला रामराम ठोकून आपली नवीन राजकीय दिशा ठरवली आहे. पटेल, तटकरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असताना परांजपे हे स्वगृही परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यास शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात आहे.
2012 मध्ये आनंद परांजपे राष्ट्रवादीत प्रवेश करताना काय म्हणाले होते?
“शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही दुर्देवाने आता राहिलेली नाही. निष्ठावान शिवसैनिकांची गळचेपी, त्यांची हेटाळणी ही आजच्या शिवसेनेत होत आहे. शिवसेना पूर्वी एक कुटुंब होतं. प्रत्येकाच्या सुख-दु:खात आम्ही सहभागी व्हायचो. माझ्या जन्मापासून मी शिवसेना पाहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या रुपाने शिवसेना पाहिली. घरात दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या रुपाने बघितली. शिवसेना कधीच सत्तेसाठी नव्हती”, अशी टीका आनंद परांजपे यांनी 2012 मध्ये केली होती.
“शिवसेनेचं ब्रीदवाक्य हे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असं होतं. पण अलिकडच्या काळात सत्तेसाठी सर्व काही आणि सत्ता हेच सर्वस्व अशी भावना शिवसेना नेतृत्वात आलेली आहे. विकासाच्या कामांवर इथे चर्चा होत नाही. शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेला विकास हा ठाणे महापालिका. कल्याण डोंबिवली महापालिका. उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषद असेल, शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असणारा विकास तिथे होत नाही”, असं त्यावेळी आनंद परांजपे म्हणाले होते.
