• Fri. Jul 3rd, 2026

    एकल पालक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणार – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 14, 2026
    एकल पालक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणार – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ, निराश्रित, बेघर आणि निवाऱ्याची गरज असलेल्या 18 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना संगोपन आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रति बालक दरमहा 2250 रुपयांचे परिपोषण अनुदान दिले जाते. राज्यात 2 लाख 23 हजारांहून अधिक विद्यार्थी आई, वडील किंवा दोन्ही नसलेले असे आहेत. अशा निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

    शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, शालेय शिक्षण आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यात एकल पालक असलेल्या बालकांची संख्या मोठी असून अनेक बालके या योजनेपासून वंचित आहेत. अशा निकषांची पूर्तता करणाऱ्या विशेषत: जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन महिला व बालविकास विभागाकडे सादर करण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असे कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

    जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिकाम्या असलेल्या वर्ग खोल्या अंगणवाडीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण संचालकांनी एका आठवड्यात आढावा घेऊन यादी सादर करावी, असे निर्देश मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. त्याचबरोबर प्री स्कूल अभ्यासक्रमासंदर्भात पात्रता असलेल्या अंगणवाडी सेवकांना शालेय शिक्षण विभागामार्फत सहा महिन्यांचे प्रशिक्षण तातडीने देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘केअर अँड प्रोटेक्शन’ ची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या बालसंगोपन योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन सध्या एक लाख 59 हजार विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जात असल्याची माहिती दिली. आधार संलग्न असलेल्या या योजनेच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने इतर सर्व पात्र वंचित विद्यार्थ्यांना हा लाभ मिळवून दिला जाईल. प्री स्कूल अभ्यासक्रमासाठी सध्या महिला व बालविकास विभागाकडे 50 हजार अंगणवाडी सेविकांची नोंदणी झाल्याची माहिती देऊन उर्वरित अंगणवाडी सेविकांची नोंदणी करुन घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येणार आहे. याबाबत या बैठकीत सादरीकरण करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पूर्वइतिहास कळण्यासाठी ही तपासणी विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर करण्यात यावी, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली.

    ०००००

    बी.सी. झंवर /वि. सं.अ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed