• Sun. Jun 7th, 2026

    Pune News: पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरखाली पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

    Pune News: पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरखाली पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

    Accident News: जोरदार धडक बसताच दुचाकी अक्षरशः रस्त्यावर घसरत गेली आणि दोघेही टँकरखाली ओढले गेले.

    पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : खेड शिवापूर टोलनाक्याजवळ आज दुपारी एक भीषण अपघात झाला असून या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. भरधाव गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की काही क्षणांसाठी महामार्गावरील वाहनचालकही थरारून गेले. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टँकरची तोडफोड केली. तसेच चालकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला.

    कसा झाला अपघात?

    मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील राजेंद्र मोरे आणि त्यांच्या पत्नी सविता मोरे हे दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दुपारच्या सुमारास ते खेड शिवापूर टोलनाक्याच्या पुढे आले. परंतु मागून भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

    दोघांचा जागीच मृत्यू, महामार्गावर गोंधळ

    अपघाताचा मोठा आवाज होताच आसपासचे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. रस्त्यावर पडलेली दुचाकी आणि रक्ताचे डाग पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. काही काळ महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता.

    संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड

    या घटनेनंतर नागरिकांचा संताप अनावर झाला. “भरधाव वाहनांमुळे रोज जीव जातायत,” अशी प्रतिक्रिया देत काहींनी गॅस टँकरची तोडफोड केली. त्यामुळे काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

    टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला ताब्यात घेण्यात आलं आहे. नेमका अपघात कसा झाला, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

    अपघातांची मालिका सुरूच

    दरम्यान पुण्यामध्ये वारंवार अपघातानची मालिका सुरूच आहे. टँकरच्या अपघातांची संख्या वाढली असून आता नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दररोज होणाऱ्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा