• Thu. Jul 2nd, 2026

    ‘टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 7, 2026
    ‘टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न – महासंवाद

    मुंबई, दि. ७ : चॅट जीपीटी, जेमिनी यांसारख्या एआय प्लॅटफॉर्मचा शासकीय पत्रव्यवहार, अहवाल तयार करणे, डेटा विश्लेषण आणि नागरिक सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी कसा उपयोग होत आहे, याची माहिती फ्रंटियर टेक्नॉलॉजी, नसकॉम चे संचालक एम. चोक्कालिंगम यांनी दिली.

    सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंत्रालय येथे टेक-वारी 2.0 अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स: हँड ऑन विथ जनरेटिव एआय या विषयावर विशेष तांत्रिक सत्राचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते.

    शासन व्यवस्था आणि सार्वजनिक प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चे वाढते महत्त्व या सत्रात अधोरेखित करण्यात आले. प्रमुख वक्ते चोक्कालिंगम यांनी तमिळनाडू ई-गव्हर्नन्स एजन्सी आणि नॅसकॉम मधील आपल्या अनुभवांच्या आधारे शासनाच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता आणि सेवा वितरण कसे सुधारत आहे, याविषयी माहिती दिली.

    सत्रादरम्यान सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि जनरेटिव्ह एआय यांच्या मूलभूत संकल्पना सोप्या आणि व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या.

    यावेळी एआय आधारित रिपोर्टिंग सिस्टीम, शासकीय योजनांसाठी चॅटबॉट सेवा तसेच आरोग्य क्षेत्रातील एआय-आधारित उपक्रमांची उदाहरणेही मांडण्यात आली. विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि प्रशासनात AI च्या वापराबाबत त्यांनी उत्सुकता व्यक्त केली.

    सत्राच्या समारोपात वक्त्यांनी एआय हे मानवाचे पर्याय नसून मानवी कार्यक्षमता आणि निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम करणारे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. भविष्योन्मुख प्रशासनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

    ‘टेक-वारी 2.0’ मध्ये व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
    ००००

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed