• Thu. Jul 2nd, 2026

    शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 7, 2026
    शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले – महासंवाद

    मुंबई, दि. ७ – रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

    ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि ग्रामविकासाला गती देण्याच्या दृष्टीने मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विभागीय आढावा बैठक घेण्यात आली.

    मंत्री भरत गोगावले यांनी विविध जिल्ह्यांतील रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत सध्या सुरू असलेल्या मनरेगा व मातोश्री ग्राम समृद्धी योजनेंतर्गत कामांचा जिल्हानिहाय आढावा घेतला. यामध्ये रोजगार हमी योजनेतील नोंदणीकृत मजुरांची संख्या, प्रत्यक्ष सुरू असलेली कामे, प्रलंबित मंजुरी, निधी वापर, तसेच शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांबाबतची सद्यस्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, केंद्र शासनाने व्ही.बी.जी राम जी अधिनियम 2025 पारित केला असला तरी सदर अधिनियम अद्याप अंमलात आलेला नसून मनरेगा योजना पूर्ववत सुरू आहे. त्यामुळे विद्यमान कार्यपद्धतीनुसार सर्व कामे वेळेत आणि नियमबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाकडून मनरेगा कामांसाठी कोणतीही अंतिम कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    शेत/ पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाची प्राधान्याची योजना असल्याचे सांगत मंत्री भरत गोगावले यांनी या कामांमध्ये अधिक गतिमानता आणण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या मागण्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात शेत/ पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. क्षेत्रीय स्तरावर या कामांच्या अंमलबजावणीस गती द्यावी, असे त्यांनी सांगितले. मंजूर कामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करून त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी तसेच संबंधित कामांचे वर्ककोड तत्काळ तयार करून कार्यारंभ आदेशासह हजेरीपत्रके निर्गमित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सुरू असलेल्या कामांची उर्वरित हजेरीपत्रके देखील त्वरित निर्गमित करून कामांचे मोजमाप घेऊन देयके नरेगासॉफ्ट प्रणालीवर विनाविलंब नोंदविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

    केंद्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ग्रामपंचायत स्तरावर 20 पेक्षा अधिक कामे सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शासनमान्य शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

    या बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    ०००००

    बी.सी.झंवर/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed