• Thu. Jul 2nd, 2026

    खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 7, 2026
    खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    नाशिक, दि. ७ मे ,२०२६ (जिमाका वृत्तसेवा):  आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी-बीयाणे व रासायनिक खतांचा सुरळीत व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. खतांचा कृत्रिम तुटवडा जाणवणार याची दक्षता घेत तालुकानिहाय मागणीचा अभ्यास करून वेळेत खत वितरण करावे, असे निर्देश  अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

    जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगापूर्व आढावा बैठक आज दुपारी आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.पवन दत्ता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, कृषी विकास अधिकारी वरुण परदेशी, सहाय्यक वनरक्षक कल्पना वाघेरे, सहाय्यक वनरक्षक संतोष सोनवणे यांच्यासह कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

    मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की,  खरीप हंगाम लवकरच सुरू होईल. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पीकाचा प्रकारानुसार आवश्यक बी-बीयाणे व खतसाठा तयार ठेवून मागणीनुसार त्याचे वितरण करावे. तसेच खताचे लिंकिंग होणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार येणाऱ्या काळात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची अनियमितता किंवा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उद्भवू शकते, यासाठी बी-बियाणांचा साठा पुरेसा ठेवण्याचे नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी विभागाने दूरसंचार विभागाशी समन्वय साधून सर्व्हे करून जिल्ह्यातील आवश्यक गावांमध्ये मोबाईल टॉवरबाबत पाठपुरावा करावा, असेही मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

    कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांच्या निकषात वेळोवेळी होणारे बदल, गुणवत्तापूर्ण निविष्ठा खरेदीबाबत ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारून त्यामधील माहितीची अचूक नोंद ठेवावी. कृषी विभाग व आदिवासी विकास विभाग, तसेच इतर विभागांच्या समन्वयातून योजना प्रभावीपणे राबवाव्यात. वनपट्टाधारक शेतकऱ्यांना शेतकरी आयडी उपलब्ध करून द्यावा. नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करावा, रेशीम विभागाने अधिकाधिक लाभार्थी सहभागी करून विद्यमान प्रकल्पांमध्ये सातत्य ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

    खासदार डॉ. बच्छाव यांनी महिलांसाठी कृषी व प्रक्रिया उद्योग विषयक विशेष प्रशिक्षण आयोजित करून महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा व त्यांना उद्योजक बनविण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना केली. तसेच नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढवून विषमुक्त अन्न उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

    जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता कृषी विभागाने काम करावे. एल निनो च्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर येणारे वाण, तसेच आंतरपीक पद्धती बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत सूचना दिल्या.

    यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे अनुदान वितरित करण्यात आले, तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत अपघातग्रस्त कुटुंबातील वारसांना धनादेशाद्वारे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या पुस्तिका व घडीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले.

    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी  प्रास्ताविक केले तर आत्मा चे प्रकल्प संचालक श्री. काशीद यांनी आभार मानले.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed