• Sat. Jun 20th, 2026

    पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संस्थांच्या जतन, संवर्धनाची कामे त्वरीत करावीत – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 5, 2026
    पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संस्थांच्या जतन, संवर्धनाची कामे त्वरीत करावीत – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन म्हणून द पीपल्स एज्युकेशन सोसायटीअंतर्गत शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या जीर्णोद्धार, जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र योजनेस मान्यता देण्यात आली आहे. सोसायटीअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार कामांसाठी तांत्रिक प्रक्रिया वेळेत सुरू करून याबाबत परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

    सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली द पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, दूर दृश्य प्रणाली द्वारे समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो.ना. बागुल, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या जीर्णोद्धार, जतन व संवर्धन या योजनेत नऊ शैक्षणिक संस्था व दोन वसतिगृहांचा समावेश असून, त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित शैक्षणिक संस्था व वसतिगृहांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सविस्तर अंदाजपत्रक तयार करून विभागाकडे सादर करावे. सर्व संस्थांनी प्रस्ताव लवकर सादर करावेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संवर्धनाची कामे करताना मूळ वास्तूंची ओळख अबाधित ठेवण्यात येणार आहे. या योजनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाचे जतन होऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच ऐतिहासिक शैक्षणिक संस्थांचे वैभव पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed