• Sun. Jun 14th, 2026
    Raj Thackeray: राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, ॲड असीम सरोदे यांची मागणी; भोर प्रकरणी ठाकरेंच्या सोशल मीडिया पोस्टवर आक्षेप

    Pune Bhor Nasrapur Girl News: आरोपीला ठेचून मारा, अशा मागण्या करणं म्हणजे समाजात बेकायदेशीरता पसरवण्याचा प्रयत्न असून यातून लोकांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केल्यासारखं होईल, असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.

    राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अॅड असीम सरोदे यांची मागणी; भोर प्रकरणी ठाकरेंच्या सोशल मीडिया पोस्टवर आक्षेप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या साडेतीन वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ६५ वर्षीय नराधमाने विकृतीचे टोक गाठत चिमुकलीवर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली. या आरोपीविरोधात सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जात असून त्याला ठार करण्याची मागणीही केली जात आहे. आरोपीचा एन्काऊंटर करा, अशी मागणी अभिनेते प्रवीण तरडे यांनी सरकारकडे केल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आरोपीला हालहाल करून संपवण्याची मागणी केली आहे. मात्र या मागण्या बेकादेशीर असून आरोपीला कायद्यानुसारच कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका मांडत वकील असीम सरोदे यांनी बेकादेशीर मागण्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

    भोरमधील घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, अशी भूमिका राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून मांडली आहे. या भूमिकेला विरोध करत ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’सोबत बोलताना अॅड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की, “भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार १०० टक्के फाशीची शिक्षा होईल. पण ती होण्याआधी त्याचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशा बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. कायदा हा एखाद्या घटनेसाठी बनवला गेलेला नसतो तर तो चिरंतन असतो. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्या घटनेपुरता कायदा बाजूला ठेवून वागावं आणि नंतर पुन्हा लोकशाहीने वागावं, असं सोयीनुसार करता येत नाही,” असं स्पष्ट मत सरोदे यांनी मांडलं आहे.

    “कसाबसारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या गुन्हेगारालाही भारत सरकारने सरकारी वकील देऊन त्याचे म्हणणं मांडण्याची संधी दिली होती आणि नंतर त्याला कायद्यानुसार फाशीची शिक्षा दिली. कोणत्याही आरोपीला आधी त्याचे म्हणणे मांडून द्यायचे आणि नंतर कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा द्यायची, ही जगभरात रूढ झालेली व्यवस्था आहे. त्यानुसार भोर प्रकरणातही व्हावं. भोर प्रकरणातील आरोपीला कायद्याने कठोर शिक्षा होईल आणि त्याला फाशीचीच होईल, यात कोणतीही शंका नाही,” असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

    राज ठाकरेंनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय?

    भोरमधील घटनेवरून आरोपीबाबत आक्रमक मागणी करताना राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात साडेतीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं. नंतर तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला व भयानक चीड आली असून या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं. सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. असं नाहीये की ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे., याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही?” असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

    शक्ती कायदा लागू करण्याची मागणी

    नसरापूर इथं घडलेल्या अमानुष घटनेनंतर राज्यात पुन्हा एकदा शक्ती कायदा लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत सरकारला आवाहन केलं आहे.”एका फुलासारख्या चिमुरडीसोबत आरोपीने केलेलं कृत्य हे हैवानी व विकृतीचा कळस आहे असून या कृत्याबद्दल त्याला फासावर लटकेपर्यंत या विषयाचा सर्वांनी प्रयत्न करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करु असा शब्द या कुटुंबाला दिला. राज्यात शक्ती कायदा नसल्यामुळं माणसातील जनावरांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी सरकारने तात्काळ शक्ती कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. असं झालं नाही तर भविष्यातही अशा अनेक कळ्या उमलण्याआधीच कुस्करल्या जातील व त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल,” असं रोहित पवार म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा