• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai News: राणीच्या बागेत येणार नवे ‘रॉयल’ पाहुणे! नागपूरहून मुंबईत वाघांची जोडी आणण्यासाठी प्रयत्न

    Mumbai News: राणीच्या बागेत येणार नवे ‘रॉयल’ पाहुणे! नागपूरहून मुंबईत वाघांची जोडी आणण्यासाठी प्रयत्न

    Royal Bengal Tigers: सहा महिन्यांत दोन वाघ गमावल्यानंतर, मुंबईतील राणीच्या बागेत वाघांची जोडी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राणीच्या बागेतील जय आणि करिष्मा या वाघांच्या सोबतीला ही जोडी येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) वाघ हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. येथे सध्या दोनच वाघ असून ही संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार लवकरच आणखी एक रॉयल बंगाल वाघाची जोडी दाखल होणार आहे. नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातून ही जोडी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

    Maharashtra TimesMumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास

    छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० रोजी राणीच्या बागेत शक्ती (नर) आणि करिश्मा (मादी) ही रॉयल बंगाल वाघाची जोडी देवाण-घेवाण तत्त्वावर आणली होती. तेव्हापासून ही जोडी मुख्य आकर्षण ठरली आहे. उद्यानात येणारे पर्यटक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात. करिश्मा वाघिणीने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी जय आणि रुद्र या दोन नर बछड्यांना जन्म दिला. सन २०२४मध्ये आजारपणामुळे रुद्रचा मृत्यू झाला. सन २०२५मध्ये शक्ती वाघही दगावला.

    जय आणि करिश्माच्या सोबतीला जोडी

    आता पुन्हा जय आणि करिश्मा हे दोन वाघच उरले आहेत. त्यांच्या सोबतीला आणखी एक नर-मादी वाघांची जोडी आणण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रयत्न करत आहे. यासाठी नागपूरमधील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाशी पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यांच्याकडून मंजुरी मिळताच गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाकडून राणीच्या बागेला वाघाची जोडी दिली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्या बदल्यात पक्षी किंवा प्राणी राणी बाग प्राणिसंग्रहालयाकडून गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला दिले जातील.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार! राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पावासाची शक्यता; विदर्भासाठी यलो अलर्ट जारी

    सिंह आणण्यासाठीही प्रयत्न

    राणीच्या बागेत विविध प्राणी, पक्ष्यांबरोबरच येथील नानाविध सौंदर्य पाहण्यासाठी मुंबई, राज्यासह देशभरातील पर्यटक येतात. सहा हजार ६००हून अधिक विविध झाडे आणि ३२ प्रजातींचे ३५६ प्राणी-पक्षी येथे आहेत. यामध्ये बिबळ्या, कोल्हा, अस्वल, तरस, वाघ, सांबर, हरीण, काळवीट, पाणघोडा, आफ्रिकी पोपट, बगळा, मगर, सुसर आदी प्राणी-पक्षी या बागेत आहेत. गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी मृत्यू झाल्याने प्राणी-पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. रॉयल बंगाल वाघाची जोडी आणण्याचा प्रयत्न होत असतानाच सिंह आणण्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा