• Wed. Jun 17th, 2026
    ICU बेड नसल्याने स्ट्रेचरवर ठेवलं, उपचारावेळी खाली पडल्याने लेकीचा मृत्यू, कूपर हॉस्पिटलवर कुटुंबाचे आरोप

    Woman dies in Cooper Hospital : ​‘आयसीयू’मध्ये बेड नसल्याचे सांगून डॉक्टरांनी स्ट्रेचरवर ठेवून तरुणीवर उपचार सुरू केल्याची माहिती तिच्या काकांनी दिली. उपचारादरम्यान ती खाली पडल्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला, तेव्हा आई-वडिलांना विदारक चित्र दिसलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित असताना कूपर हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत दोन रुग्णांचा आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एका तरुणीचा स्ट्रेचरवरुन पडून, तर दुसऱ्याचा ‘आयसीयू’त बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप दोन्ही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.

    गोरेगावकर तरुणीला पोटदुखी

    गोरेगाव येथे राहणाऱ्या संध्या यादव (२७) हिला शनिवारी सकाळी तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचार देऊन तिला घरी पाठवण्यात आले. त्याच दिवशी रात्री तिला पुन्हा तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    स्ट्रेचरवरुन खाली पडली

    ‘आयसीयू’मध्ये बेड नसल्याचे सांगून डॉक्टरांनी स्ट्रेचरवर ठेवून तिच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती तिचे काका राजेंद्र यादव यांनी दिली. उपचारादरम्यान ती खाली पडल्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला. तेव्हा ‘आयसीयू’बाहेर बसलेल्या तिच्या पालकांना संध्या खाली पडल्याचे दिसले. त्यांनी मुलीकडे धाव घेतल्यावर डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.

    मुलीच्या काळजीने व्यथित झालेल्या पालकांनी तिला नेमके काय झाले आहे याची वारंवार विचारणा करुनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर पालकांनी तिचे काका राजेंद्र यांना बोलावून घेतले. त्यांनाही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली.
    Maharashtra TimesNashik News : लेकाचा गंभीर अपघात, ‘ब्रेन डेड’ घोषित; ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रुपात जिवंत राहील’, आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय

    सीपीआरचे प्रयत्न अयशस्वी

    त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संध्याची प्रकृती बिघडली असून, तिला ‘सीपीआर’ देऊन वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. रविवारी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी संध्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर कुटुंबीयांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात मदतीसाठी धाव घेतली. शवविच्छेदन करण्याचीही कुटुंबीयांची तयारी नव्हती.

    Sanjay Shirsat | बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलिन करणार? शिरसाट काय म्हणाले?

    नालासोपाऱ्यातील तरुणाचा बेडअभावी मृत्यू

    दुसरीकडे, नालासोपारा येथे राहणाऱ्या कैलास सिंह (३८) यांना वैद्यकीय उपचारासाठी शनिवारी कूपर रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते. चित्रपटसृष्टीमध्ये मदतनीस म्हणून काम करत असलेल्या कैलास यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) तातडीने दाखल करण्याची गरज असतानाही त्यांना बेड मिळाला नाही. त्यामुळे जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

    पत्नीचा धाय मोकलून आक्रोश

    त्यांच्या पत्नी पूजा सिंह यांनी त्यांना ‘आयसीयू’ची गरज असताना तिथे दाखल का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर, ‘सर्वसामान्य गरजू रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळत नसेल तर त्यांनी कुणाकडे आशेने पाहायचे? आता माझ्या दोन लहान मुलांचे काय होणार? असे प्रश्न विचारत पूजा सिंह धाय मोकलून रडायला लागल्या.
    Maharashtra TimesNagpur News : मोकाट कुत्रे भुंकताच मंगलताई घाबरल्या, जीव वाचवण्यासाठी पळाल्या, पण भरधाव कारच्या धडकेत मृत्यूने गाठलं
    कूपर रुग्णालयाच्या ‘आयसीयू’त दहा बेड असून त्यातील काही बेड आरक्षित ठेवले जातात. स्थानिक लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधीक्षकांच्या संपर्कातून येणारे रुग्ण यांच्यासाठी काही बेड राखून ठेवले जात असल्याने ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जात नाहीत, असेही निदर्शनास आले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा