• Fri. Jun 5th, 2026

    Jay Pawar : ‘पवार विरुद्ध पवार लढतीची आमची इच्छा नाही; आम्ही सर्व एकत्र राहावं अशी पवार कुटुंबाची भावना’, जय पवार यांचं वक्तव्य

    Jay Pawar : ‘पवार विरुद्ध पवार लढतीची आमची इच्छा नाही; आम्ही सर्व एकत्र राहावं अशी पवार कुटुंबाची भावना’, जय पवार यांचं वक्तव्य

    बारामती पोटनिवडणूक पार पडत असताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीची सध्या चर्चा होऊ लागली आहे. आगामी 2029 च्या निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. त्यावर आता जय पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती जागेवर पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत ताकदवान असा विरोधी उमेदवार नसल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पण या पोटनिवडणुकीत आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होईल का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमदार रोहित पवार यांनी शक्यता नाकारता येत नाही, असं म्हटलं आहे. अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनीदेखील याबाबत सकाळी वक्तव्य केलं होतं. पण आता जय पवार यांनी कुटुंब म्हणून एकत्र राहायला हवं, अशी भूमिका मांडली आहे.

    बारामतीत राजकीय वातावरण तापले असताना जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक महत्त्वाचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदानाचा अंदाज, उमेदवारीबाबतची भूमिका आणि कुटुंबातील एकतेचा मुद्दा स्पष्टपणे मांडले.

    जय पवार म्हणाले की, “या निवडणुकीत सुमारे 60 टक्के मतदान होईल,” असा अंदाज आहे. सकाळच्या वक्तव्याचा गैरसमज झाल्याचेही त्यांनी स्पष्ट करत, “मी सकाळी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला,” असे सांगितले. दरम्यान, मतदानाच्या टप्प्यांबाबतही त्यांनी निरीक्षण नोंदवले. “सकाळी चांगलं मतदान झालं, दुपारी थोडी घट झाली, मात्र संध्याकाळी चारनंतर पुन्हा वाढ होत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

    2029 च्या बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या चर्चांवर बोलताना जय पवार यांनी संयमित भूमिका घेतली. “2029 मध्ये मी उमेदवारी घ्यावी, अशी लोकांची इच्छा आहे. पण माझी स्वतःची इच्छा लोकांसोबत राहून काम करण्याची आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “मी सुरुवातीपासूनच सांगत आलोय की, मला छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे.” यापूर्वी नगराध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत आले होते, त्यावेळीही आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेतच राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

    ‘कुटुंब म्हणून एकत्र राहायला हवं’

    पवार कुटुंबातील एकतेबाबतही त्यांनी स्पष्ट संदेश दिला. “युगेंद्र दादांनीही म्हटलं आहे की, आम्ही एकमेकांविरुद्ध लढायला नको. मलाही वाटतं की कुटुंब म्हणून आपण एकत्र राहायला हवं,” असे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हावी, अशी आमची अजिबात इच्छा नाही,” असे स्पष्ट केले.

    जय पवार नेमकं काय म्हणाले?

    “माझं आणि युगेंद्र दादांचं बोलणं झालं. आमच्या दोघांचीच नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की, आम्ही सर्व एकत्र राहावं. 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार असं रोहित दादा बोलले. पण तशी आमची इच्छा नाही”, अशी प्रतिक्रिया जय पवार यांनी दिली. यावर पत्रकारांनी दोन्ही पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “ते मी नाही सांगू शकत. त्याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया जय पवार यांनी दिली.

    दरम्यान, वैयक्तिक पातळीवर बोलताना जय पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृती विषयी सुरू असलेल्या चर्चेवर अधिक माहिती दिली. “माझं रेवतीशी बोलणं झालं आहे, आजोबांना आता डिस्चार्ज दिला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा