• Sun. Jun 14th, 2026
    Rohit Pawar : रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा, शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त

    आमदार रोहित पवार यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. शिखर सहकारी बँकेच्या कथित प्रकरणात रोहित पवार आणि इतर आरोपींना विशेष न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर सहकारी बँकेकडून कर्जांचे वितरण करताना सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याच्या प्रकरणातून विशेष न्यायालयाने रोहित पवार आणि इतरांना आरोपमुक्त केले आहे.

    मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात रोहित पवार यांच्यासह अनेकांनाही आरोपी केले होते. मात्र, इओडब्ल्यूचा सी-समरी (क्लोजर रिपोर्ट) अहवाल विशेष एसीबी न्यायालयाने 27 फेब्रुवारी रोजी स्वीकारल्याने तो गुन्हाच अस्तित्वात राहिला नाही. त्यामुळे ईडीचा गुन्हाही कायद्याच्या कसोटीवर टिकत नसल्याचे म्हणणे मांडत आरोपमुक्ती देण्याची विनंती रोहित पवार आणि अन्य आरोपींनी केली होती. अखेर विशेष न्यायालयाने रोहित पवार आणि इतरांची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

    “ईओडब्ल्यूने दोन वेळा या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केलेले असतानाही ईडीने मला आरोपी केले आहे. हे निव्वळ मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी करण्यात आले आहे”, असा दावा रोहित पवार यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना केला होता.

    नेमकं प्रकरण काय?

    ईडीने रोहित पवार यांच्या विरोधात कठोर कारवाई केली होती. विशेष म्हणजे रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कंपनीतही 2023 मध्ये ईडीने छापेमारी केली होती. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केला होता. तर विरोधकांनी या प्रकरणावरुन भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

    मुंबई गुन्हे शाखेने ऑगस्ट 2019 मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील FIR मध्ये गंभीर आरोप होते. महाराष्ट्र राज्य शिखर सहकारी बँकेच्या तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी अनेक साखर कारखाने हे अत्यल्प किंमतीत विकले. त्यात पारदर्शकता ठेवली नाही. कादेशीर प्रक्रिया मोडीत काढली आणि आपल्या निकटवर्तीयांना किंवा संबंधित कंपन्यांना फायदा मिळवून दिला, असा आरोप करण्यात आला होता. यामध्येच कन्नड साखर कारखान्याचं एक प्रकरण होतं. याच प्रकरणात रोहित पवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

    कन्नड साखर कारखान्यावर 80 कोटींपेक्षा जास्त कर्ज होतं. कर्जफेड न होऊ शकल्याने बँकेने या कारखान्यावर जप्ती आणली होती. तसेच या कारखान्याचा लिलाव बँकेकडून करण्यात आला होता. मात्र या लिलावात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. कारखान्याची राखीव किंमत मुद्दाम खूप कमी ठेवली गेली आणि जास्त बोली लावणाऱ्या स्पर्धकाला कमकुवत कारणे देवून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कारखाना अशा कंपनीला देण्यात आला ज्याचा संबंध बारामती ॲग्रो म्हणजेच रोहित पवार यांच्या कंपनीशी होता, असा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. ईडीने याच प्रकरणी 2023 मध्ये बारामती ॲग्रो आणि अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने अनेक कोटींची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी विविध घडामोडी घडल्या आहेत. यानंतर आता रोहित पवार यांना या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा