सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या सांगता सभेत शरद पवारांचा गौरव केला. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना नातं जपण्याची भावनिक साद घातली आहे.
अजितदादांच्या निधनानंतर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून सावरत सुनेत्रा पवार यांनी केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर राज्याची जबाबदारीही समर्थपणे पेलली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली. आता स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा केलेला उल्लेख राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
शरद पवार , सुप्रिया सुळेंचे आभार
“अजित दादांना सर्वप्रथम मनापासून वंदन करते. आपल्याला सर्वांना माहिती आहे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. आदरणीय पवार साहेब व सौ सुप्रियाताई यांचे मी विशेष आभार मानते. तसेच ज्या ज्या संस्था संघटनांनी मला उस्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते. हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधील आहे, असं मी मानते,” असं पवार यावेळी म्हणाल्या.
Supriya Sule : ‘हा दिवस येईल वाटलं नव्हतं, वहिनींना साथ द्या, दादाला…’; बारामतीतील प्रचार सभेत सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला
“तुमच्याकडे नातं टिकवायला आलेली आहे”
आज मी इथे उभी आहे महायुतीचा उमेदवार म्हणून फक्त उमेदवार म्हणूनच नाही. तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो ही लढाई सोपी नाही. पण मी एकटी नाही कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही मी तुमच्याकडे नात टिकवायला आलेली आहे.
शारदाबाई पवारांचे स्मरण
“आज या मंचावर एका व्यक्तीचे आवर्जून स्मरण करणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यांनी पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी केली, त्या अजितदादांच्या आजी आदरणीय शारदाबाई पवार यांचे. त्यांनी सून म्हणून केवळ पवारांचे कुटुंब सांभाळले नाही, तर त्यांनी संस्कार, नीतीमूल्ये आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली. यामधूनच पुढे विविध क्षेत्रांतील मोठी नेतृत्वे घडत गेली. त्या केवळ कुटुंबापुरत्याच मर्यादित न राहता, त्यांनी समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडीत मोलाचा वाटा उचलला”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
“पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला आणि खऱ्या अर्थाने आदरणीय अजितदादांनी अपार कष्टाने त्यावर कळस चढवला. आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत; तसेच आमच्या आई श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, हा आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे.”
