• Tue. Jun 30th, 2026

    अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप मुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून सेवा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 21, 2026
    अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप मुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून सेवा – महासंवाद

    मुंबई, दि. २१ : महामंडळाने अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप हे मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून, लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे.तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे वस्थापकीय संचालक विजयसिंहदेशमुख , यांनी केले आहे.

    महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित असून, महामंडळाची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे.

    योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्यामुळे लाभार्थ्यांना वेळ, खर्च आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून महामंडळाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करून योजनांच्या सेवा प्रति सेवा रु. ८५ दराने उपलब्ध करून दिल्या.

    लाभार्थ्यांना अधिक स्वयंपूर्ण, सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळामार्फत वापरकर्ता-अनुकूल मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप या नावाने गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.

    लाभार्थ्यांनी त्यांच्या अँड्राईड मोबाईलवर हे अ‍ॅप डाउनलोड करून वापर सुरू करावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेल नोंदवून ओटीपीद्वारे नोंदणी पूर्ण करावी. पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येईल.

    महामंडळाच्या योजनांमध्ये एलओआय, सँक्शन व क्लेम असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे अ‍ॅपद्वारे अपलोड करता येतात. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे आणि पुढील कार्यवाही करणे या सर्व सुविधा अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे.

    सध्या क्लेम सादर करणाऱ्या व नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाईल, ज्यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होईल आणि पारदर्शकता वाढेल.

    यामध्ये जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, गूगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाईल. तसेच, ही माहिती महामंडळाच्या ईएचआरएमएस प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अ‍ॅपमध्येही उपलब्ध होणार आहे.

    संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा मोबाईल अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हे अ‍ॅप डाउनलोड करून त्याचा वापर करावा व या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

    0000

    वंदना थोरात/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed