• Mon. Jul 6th, 2026

    कोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 20, 2026
    कोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’ – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २०: जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक अचूक, वेगवान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून खरेदी केलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण आणि मोजणी कामाचा भव्य शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी रोव्हर, लॅपटॉप आणि स्कॅनर यांसारख्या अत्याधुनिक साहित्याचे वाटप केले. भूमी अभिलेख विभागाला खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ बनवण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल असून, या नव्या यंत्रसामग्रीमुळे नागरिकांना मोजणी, फेरफार आणि अभिलेखाच्या सेवांसाठी होणारा विलंब आता संपुष्टात येईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, उपजिल्हाधिकारी शक्ति कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले व सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

    भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने प्राप्त होत होत्या. त्यातच अद्ययावत यंत्रसामग्रीची कमतरता असल्याने कर्मचाऱ्यांनाही काम करताना मर्यादा येत होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून १८ आधुनिक रोव्हर मशीन, २६ लॅपटॉप आणि १४ स्कॅनरची खरेदी करण्यात आली आहे. यापूर्वी साधनांच्या अभावामुळे एकाच रोव्हर मशीनवर तीन-तीन कर्मचाऱ्यांना काम करावे लागत होते, मात्र आता पुरेशा साहित्यामुळे कामकाजाचा वेग वाढणार असून प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली निघण्यास मोठी मदत होणार आहे.

    याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की, केवळ साहित्याचे वितरण करून हे काम थांबणार नाही, तर या साधनांचा प्रत्यक्ष वापर प्रभावीपणे झाला पाहिजे. नागरिकांना या आधुनिकतेचा थेट फायदा मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १० जून रोजी विशेष आढावा बैठक घेऊन नवीन यंत्रसामग्रीचा किती वापर झाला, मोजणी कामाची गती किती वाढली आणि नागरिकांना त्यातून किती दिलासा मिळाला, याची शहानिशा केली जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले यांनी माहिती देताना सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ही अत्याधुनिक यंत्रसामग्री संपूर्ण महाराष्ट्रात क्वचितच कुठे पाहायला मिळेल. सध्या जिल्ह्यातील भूमापनाचे १०० टक्के काम हे जीपीएस आधारित रोव्हर तंत्रज्ञानावरच केले जात असून, दरमहा सुमारे ५ हजार मिळकत नोंदी ‘ई-पीसीआयएस’ प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. आता नव्याने प्राप्त झालेल्या साधनांमुळे जिल्ह्यातील मोजणी, फेरफार आणि अभिलेखाच्या सर्व सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि कमालीच्या अचूक पद्धतीने नागरिकांना उपलब्ध होतील, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed