Nashik Woman Died After Delivery: संगीता तात्या पवार (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, जिल्ह्यात महिनाभरातील हा तिसरा प्रकार आहे.
तताणी (ता. बागलाण) येथील संगीता पवार यांना प्रसूतीसाठी गुरुवारी (दि.१६) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) त्यांची प्रसूती करण्यात आली. नवजात बालक व माता सुखरूप असताना शुक्रवारी (दि.१७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास संगीता यांना अस्वस्थ वाटत असल्याने संबंधित डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठवावे लागेल असे सांगितले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितल्याचा आरोप संगीता यांचे पती तात्या नारायण पवार यांनी केला.
घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या दिला. पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांनी नातेवाइकांच्या भावना समजून घेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला व त्यानंतर नातेवाइकांनी तो ताब्यात घेतला.
कैसे हराया फेम सहर शेख नॉट रिचेबल; नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल
रुग्ण कल्याण
समिती शोभेलाच?
कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत मातेचा मृत्यू होऊन पाच तास झाल्यानंतरही रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित नव्हते. येथील बहुतांश वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासी राहण्याचा भत्ता, पगारात घसघषीत वाढ घेतात. मात्र, रुग्णालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत त्याचा हकनाक त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भोगावा लागतो. अधीक्षकच वेळेवर उपस्थित राहत नाही त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे कर्मचारी मनमानी करतात, असा आरोप मयत रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. या सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणजे रुग्णालय कल्याण समितीही बघ्याची भूमिकाच घेणारी ठरत आहे.
शासकीय रुग्णालयात गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी येतात; मात्र या रुग्णाच्या शस्त्रक्रिया करतेवेळी लागणारे औषधे, व इतर साहित्य रुग्णांच्या नातेवाइकांना आणण्यास सांगून खासगी मेडिकलमधून ते मागविले जाते. मग शासनाने शासकीय रुग्णालय कशासाठी उभारल? असा सवाल उपस्थितांनी केला. या ठिकाणाहून सर्रास खासगी रुग्णालयात रुग्णांना पाठविण्यात येते, तर काही डाॅक्टर खासगी रुग्णालयात इतर रुग्णांना तपासणी करण्यासाठी जात असल्याचा आरोप होत आहे.
TCS Nashik Case: पुण्यात शिक्षण, नाशिकमधील TCS मध्ये पायथन डेव्हलपर; निदा खानचं बॉम्बस्फोट केसमध्येही कनेक्शन? A टू Z स्टोरी
मालेगावातील घटना ताज्या
मालेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच महिलेचा मृत्यू झाल्याच्या महिनाभरात दोन घटना घडल्या. शनिवारी, ११ एप्रिल रोजी प्रसूतीनंतर सीमा समाधान आहेर (वय ३२, रा. मळगाव, ता. नांदगाव) या महिलेचा मृत्यू झाला होता, तर तत्पूर्वी बागलाण तालुक्यातील करंजाड येथील साक्षी शंकर वणीस (वय २१) या महिलेने २३ मार्च रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावून त्यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवत आक्रोष केला होता. जिल्हा रुग्णालय अधीक्षकांनी तत्काळ पाच सदस्यीय कमिटी स्थापन करून तिचे नाशिक येथे इन कॅमेरा शवविच्छेदन केले होते. या दोन्ही प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप दोन्ही घटनेतील नातेवाइकांनी केला होता.
