• Sun. Sep 20th, 2026

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 18, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना – महासंवाद

मुंबई, दि. १८ : अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आज झालेल्या राज्यस्तरीय दूरदर्शन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉन्फरासिंगद्वारे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर लक्ष ठेवून बालविवाह होणार नाहीत यासाठी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे. तालुका व ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करून देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर विवाहस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. बालविवाहाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलीस व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हानिहाय कृती आराखडे तयार केले जात आहेत. सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश आहेत. याशिवाय, विवाहाशी संबंधित सेवा देणारे जसे की मंगल कार्यालये, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर, वाजंत्री तसेच धर्मगुरू यांनी मुलगा-मुलगी यांच्या वयाची खात्री केल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणार आहे. बालविवाहाविरोधात जनजागृती वाढवण्यासाठी गावोगावी दवंडी, पोस्टर मोहीम, विशेष ग्रामसभा, शाळांमध्ये पालक बैठक तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे.

दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, बालविवाहासंदर्भातील कोणतीही माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा डायल 112 वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल,  राज्यात बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी यावेळी केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed