• Mon. Jun 15th, 2026

    Pune Crime : ’50 लाख दिल्याशिवाय सुटका नाही’; कॅफेत गप्पा, प्लॅन्ट दाखवायला नेलं अन् पुढे थेट किडनॅप; देणी वसूल करण्यासाठी मेट्रो कंत्राटदारासोबत खळबळजनक प्रकार

    Pune Crime : ’50 लाख दिल्याशिवाय सुटका नाही’; कॅफेत गप्पा, प्लॅन्ट दाखवायला नेलं अन् पुढे थेट किडनॅप; देणी वसूल करण्यासाठी मेट्रो कंत्राटदारासोबत खळबळजनक प्रकार

    Pune Businessman Kidnapping Case : पुण्यातील मेट्रो कंत्राटदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडी क्रशर प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने ओळखीच्याच व्यक्तीने व्यावसायिकाला बोलावून कंटेनरमध्ये डांबले आणि मारहाण केली. आरोपींनी वडिलांकडे खंडणी मागताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली.

    पुण्यात ५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो कंत्राटदाराचे अपहरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : मेट्रो प्रकल्पात काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला खडी क्रशर प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून, त्याचं भरदिवसा अपहरण केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ५० लाखांच्या जुन्या वादातून पाच जणांनी व्यावसायिकाला कंटेनरमध्ये डांबून मारहाण केली आणि त्यांच्या वडिलांकडे खंडणी मागितली. मात्र, खराडी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अहिल्यानगर रस्त्यावर सिनेस्टाईल पाठलाग करून नाकाबंदी केली आणि गुंडांच्या तावडीतून व्यावसायिकाची सुखरूप सुटका करत पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाने सध्या एकच खळबळ उडाली आहे.

    आरोपी अटक

    या प्रकरणात सागर दत्तात्रय झुरुंगे (३९), विजय सुरेश वाळुंज (३८), राजू विजयकुमार सहाणे (३२), रुपेश शिवाजी गावडे (३८, सर्व रा. लोणीकंद) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (३४, रा. तुळापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    किडनॅपरसोबत आधीच होती ओळख

    या प्रकरणी गहुंजे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली आहे. हे व्यावसायिक मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्क करतात. आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख आधीपासून होती. झुरुंगे हा खडी-क्रशर माल पुरवठा करत होता आणि त्याच्याकडे सुमारे ५० लाख रुपये देणे बाकी होते.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : मृत्यूशी झुंज देत हायकोर्टाचा वकील 150 मीटर धावला, पण मारेकऱ्यांनी डाव साधलाच; क्लायंटला भेटायला गेले अन् घात झाला!

    त्यादिवशी नेमके काय घडले?

    १३ एप्रिलला झुरुंगेने फोन करून व्यवसायिकाला “कामाबद्दल बोलायचं आहे” असं सांगितलं. त्यानुसार १४ एप्रिलला खराडीतील इराणी कॅफेत दोघे भेटले. काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर “क्रशर प्लॅन्ट बघायला जाऊया” असं सांगत आरोपींनी त्यांना गाडीत बसवलं. मात्र, हा प्रवास थेट सापळ्यात नेणारा ठरला.

    असा होता प्लॅन

    खराडी जकात नाका परिसरात गाडी नेण्यात आली. त्याठिकाणी एका कंटेनरमध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे आधीपासूनच काही जण थांबलेले होते. अचानक वातावरण बदललं आणि “आजच माझे ५० लाख दे, नाहीतर सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आली. त्यांचे मोबाईल बंद करून त्यांना मारहाण करण्यात आली.

    Maharashtra TimesCrime News: 23 वर्षीय विवाहित तरुणीवर सासऱ्याकडून अत्याचार; वडिलांच्या कृत्याबद्दल पतीला सांगताच त्याच्याकडून अजब उत्तर!

    ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात’

    यानंतर आरोपींनी त्यांना पुन्हा गाडीत बसवलं. त्यानंतर पुणे-अहिल्यानगर मार्गे रांजणगावच्या दिशेने नेलं. मध्येच एका ठिकाणी गाडी बदलून दुसऱ्या वाहनात बसवण्यात आलं, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. दरम्यान, आरोपींनी व्यावसायिकाच्या वडिलांना फोन करून स्पष्ट इशारा दिला “५० लाख दिल्याशिवाय मुलगा सोडणार नाही.” वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

    पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

    खराडी पोलिसांनी लगेच कारवाई करत संशयित गाडीचा माग काढला. अहिल्यानगर रोडवरील विजय स्तंभाजवळ नाकाबंदी करून गाडी अडवण्यात आली. गाडीतून अपहरण झालेला व्यावसायिक सुरक्षित सापडला आणि पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, वेळेत कारवाई केल्यामुळे मोठी घटना टळली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा