Wadala-Kasarvadavli Metro: मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 50 ते 74 टक्क्यांनी कमी होणार आहे. एप्रिल 2026मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार होता.
मार्गाचं 84 टक्के काम पूर्ण
वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावर फक्त विक्रोळी येथील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानक बांधलं नव्हतं. या मार्गावर एकूण 30 स्थानकं असून इतर सर्व स्थानकांचं काम पूर्ण झालं होतं. ही संपूर्ण मार्गिका 32.32 किमी लांब उन्नत मार्गिका आहे. गेल्या आठवड्यात 16,762 चौरस मीटर भूखंड या प्रकल्पासाठी घेतला गेला होता. त्यामुळे आता या शेवटच्या मेट्रो स्थानकाचं काम सुरू करून ते 2027पर्यंत पूर्ण करण्याचं एमएमआरडीएचं उद्दिष्ट आहे. संपूर्ण मार्गिकेचं सध्या 84 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे हे स्थानक तयार होताच 2027मध्ये ही मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे.
विक्रोळी पूर्वेकडील ही जमीन गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या मालकिची होती. 2019मध्ये ही जमीन संपादित करण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेक अडथळ्यांमुळे हे काम रखडलं. 2021मध्ये, एमएमआरडीने या जमिनीसाठी नोटीस जारी केली होती. परंतु, कंपनीने हा मुद्द मुंबई हायकोर्टात घेऊन जात न्यायालयाकडून स्थगिती मिळवली. त्यामुळे ही नोटीस मागे घ्यावी लागली.
कशामुळे काम रखडलं?
संमतीने जमीन न मिळाल्यामुळे एमएमआरडीने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्विकास कायद्याअंतर्गत भूसंपदान सुरू केलं. परंतु, त्यानंतरही रेडी रेक्नरचे दर आणि काही राज्यस्तरीय मंजुरींची आवश्यकता असल्यामुळे हे काम थांबलं होतं. आता हे सर्व अडथळे दूर झाले असून ही जमीन 164.31 कोटी रुपये खर्चून संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी 157.7 कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आले असून 30 मार्च 2026 रोजी एमएणआरडीएला या जमिनीचा ताबा मिळाला.
हे भूसंपदान आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. विक्रोळी येथील भुखंडावर लक्ष्मीनगर स्थानक आणि त्या शेजारचं व्हायाडक्ट बांधण्यात येणार आहे. आता या जमिनीवर सर्वेक्षण सुरू झालं आहे. संपूर्ण वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी 14,549 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
संपूर्ण मार्ग कसा आहे?
एप्रिल 2026मध्ये या मार्गिकेवरील पहिला भाग सुरू करणार होते परंतु ती तारीख पुढे ढकलण्यात आली. गायमुख ते कॅडबरी जंक्शन 4.4 किमी मार्गाची सुरूवात होणार होती. या मार्गावर गायमुख, विजय गार्डनर, कासारवडवली आणि कॅडबरी जंक्शन अशी स्थानकं आहेत. या भागावरील चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या असून, 6 डब्यांच्या ट्रेनचा यासाठी वापर करण्यात आला.
ही संपूर्ण मार्गिका एकूण 3 टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या 10 किमी लांब टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत 10 स्थानकांचा समावेश आहे. पुढील दुसऱ्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर 21.5 किमी टप्प्याचा समावेश आहे. हा मार्ग ऑक्टोबर 2026पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, शेवटच्या टप्प्यात गांधीनगर ते वडाळा मार्ग तयार करण्यात येणार आहे. हे काम ऑक्टोबर 2027पर्यंत पूर्ण होईल. वडाळा ते कासारवडवली मेट्रोमुळे दक्षिण मुंबई आणि ठाण्यामध्ये थेट कनेकटीव्हीटी निर्माण होणार आहे. ठाणे-मुंबई प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
