• Tue. Jun 16th, 2026
    Jalna Samruddhi Highway Accident : जालनानजीक समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मृतांचा आकडा आठवर; मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

    समृद्धी महामार्गावर पुन्हा मृत्यूचा कहर पाहायला मिळाला. भरधाव ट्रकच्या भीषण धडकेत आता वाढलेल्या आकड्यानुसार ८ महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिवसभराचे काम आटपून घरी परतणाऱ्या या मजुरांवर काळाने झडप घातली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदत जाहीर केली आहे.

    जालनानजीक समृद्धीवर भीषण अपघात, मृतांचा आकडा आठवर; मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना: समृद्धी महामार्गावर आज सायंकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत ८ महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी हे सर्व समृद्धी महामार्गावर स्वच्छतेचे काम करणारे मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    काम आटपून घरी परतताना काळाची झडप

    मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभराचे काम आटपून हे सर्व मजूर आपल्या गावाकडे निघाले होते. त्याच वेळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे मृतांचा एकूण आकडा ८ वर पोहोचला आहे.

    मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा

    या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ जालना प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून जखमींना त्वरित उपचार देण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताबद्दल खोल दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesPune Crime : बापाची मुलाला संपवायला 75 लाखांची सुपारी, ऐनवेळी पिस्तूलचा दगा; पोरगा वाचला, बाप अन् सप्लायर अडकला

    बदनापूर तालुक्यातील कुटुंबांवर शोककळा

    या अपघातात मृत्यू झालेले सर्व मजूर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (३५), मीना परमेश्वर आदमाने (४५), कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), ताराबाई गहिनाजी चौधरी (६०), कडूबाई रामदास मदन (५५) आणि सुमनबाई कचरू आदमाने (७०) यांचा समावेश आहे. एका मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

    जखमींवर उपचार सुरू

    या भीषण अपघातात प्रयागबाई बाबासाहेब वाघ (३०), कविता विठ्ठल चौधरी (३५) आणि दिनेश रघुनाथ गायकवाड (४२) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा