• Mon. Jun 15th, 2026

    सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव : प्रशासनातील कार्यक्षमतेचा आदर्श – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 29, 2026
    सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव : प्रशासनातील कार्यक्षमतेचा आदर्श – महासंवाद

    “सोलापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशामुळे केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कार्यक्षमतेचा नवा मापदंड ठरला आहे.”

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांना “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनिक ताकदीचे आणि पारदर्शकतेचे प्रतीक आहे.

    सेवाकर्मी कार्यक्रमाचा उद्देश-

    ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेने या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

    ठळक कामगिरी-

    – ज्येष्ठता सूची : सर्व संवर्गांची अद्ययावत सूची प्रसिद्ध करून १०/१० गुण.

    – पदोन्नती नियुक्ती : मंजूर ९५९ पदांपैकी ८२० कार्यरत, रिक्त पदांचे प्रमाण कमी ठेवून १०/१० गुण.

    – सरळसेवा नियुक्ती : मंजूर १३,००७ पदांपैकी ११,४२५ कार्यरत, कार्यक्षमतेसाठी १०/१० गुण.

    – बिंदुनामावली प्रमाणीकरण : ९४.७४% प्रमाणित, १०/१० गुण.

    – अनुकंपा नियुक्ती : सर्व नियुक्त्या पूर्ण, १०/१० गुण.

    – iGOT पोर्टल प्रशिक्षण : ९५.१०% कर्मचाऱ्यांनी ५ कोर्स पूर्ण, १०/१० गुण.

    – सेवापुस्तक अद्ययावत : ९९.२७% सेवापुस्तके अद्ययावत, २०/२० गुण.

    एकूण गुणांकन : १०० पैकी ८० गुण

    सक्षम नेतृत्व-

    मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी केवळ सोलापुरापुरती मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्हा परिषदांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. त्यांनी पारदर्शकता, शिस्त आणि प्रशिक्षण यावर दिलेला भर प्रशासनाच्या कार्यक्षमतेला नवा आयाम देणारा ठरला.

    या पुरस्काराविषयी मत व्यक्त करताना श्री. कुलदीप जंगम म्हणाले की, “हा पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद आहे, परंतु पुरस्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढलेली असून पुढे असेच काम करत राहू याची खात्री आहे.”

    सांघिक कामाचे यश:-

    सोलापूर जिल्हा परिषदेचा हा गौरव हा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचा परिपाक आहे. सेवाकर्मी कार्यक्रमातील ही कामगिरी प्रशासनातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.  राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी या यशातून प्रेरणा घेऊन प्रशासनातील कार्यपद्धती अधिक सक्षम करावी, हीच खरी अपेक्षा आहे. सोलापूरने दाखवलेला मार्ग हा केवळ गौरवाचा नाही, तर जबाबदारीचा आहे.

    सोलापूर जिल्हा परिषदेने मिळवलेला हा राज्यस्तरीय सन्मान हा प्रशासनातील कार्यक्षमतेचा आदर्श ठरला आहे. पारदर्शकता, शिस्त आणि प्रशिक्षण यावर आधारित ही कामगिरी भविष्यातील प्रशासनासाठी दिशादर्शक ठरेल.

     

    सुनील सोनटक्के

    जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed