• Sat. Jul 4th, 2026

     केसांची चमक लांबसडक आणि मजबूत केस हवे असतील तर नैसर्गिक घटकांबद्दल जाणून घेऊयात

    ByMH LIVE NEWS

    Mar 24, 2026
     केसांची चमक लांबसडक आणि मजबूत केस हवे असतील तर नैसर्गिक घटकांबद्दल जाणून घेऊयात

    पुणे – प्रमोद सावतकर

    केस लांबसडक आणि काळेभोर असावे असं अनेकांना वाटतं. मात्र बदलते जीवनशैली, प्रदूषण आणि कामांचा ताणतणाव यामुळे यांचा परिणाम केसांवर सर्वात जास्‍त होतो आणि यामुळे केस गळणे, अकाली पांढरे आणि विरळ होत जाण्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण महागडे शॅम्पूचा वापर करतात. तर यातील काही हेअर प्रोडक्ट देखील खूप महाग असतात. अशातच या प्रोडक्टचा तात्पुरता परिणाम पाहायला मिळतो. मात्र केस धुण्यासाठी तुम्ही शॅम्पू वापरण्यापूर्वी काही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास हे घटक केवळ तुमचे केस खोलवर स्वच्छ करत नाहीत, तर त्यांचे पोषणही करतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नैसर्गिक घटक खूप फायदेशीर असतात, कारण ते केमिकलमुक्त असतात. चला तर मग आजच्या लेखात आपण केसांच्या वाढीसाठी कोणत्या नैसर्गिक घटकांचा वापर करावा ते जाणून घेऊयात.

    रीठा, आवळा आणि शिकेकाई : प्राचीन काळापासून केस धुण्यासाठी रीठा वापरला जात आहे. तसेच अनेक नैसर्गिक हेअर प्रोडक्टमध्येही रीठा आवळा आणि शिकेकाईचा वापर केला जातो. कारण रीठाच्या वापराने शॅम्पूप्रमाणे फेस येतो. रीठ्यामध्ये आवळा आणि शिकेकाई मिक्स करून केस धुतल्यास त्याचे आणखी जास्त फायदे तुमच्या केसांना व स्कॅल्पला होतात. हे तिन्ही घटक तुमच्या केसांसाठी वरदान आहेत. यामुळे केस काळे होण्यास आणि त्यांची लांब वाढण्यास खूप मदत होते.

    मुलतानी माती + लिंबू : मुलतानी माती केस धुण्यासाठी आणखी एक उत्तम नैसर्गिक घटक आहे. याकरिता मुलतानी माती एक तास पाण्यात भिजवून ठेवा, किंवा जर ती पावडरच्या स्वरूपात असेल, तर तुम्ही ती थेट पाण्यात मिक्स करू शकता. आता यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट केसांना मुळापर्यंत लावा यामुळे तुमचे केस खोलवर स्वच्छ होतील आणि कोंडा होण्यास प्रतिबंध होईल. केस धुतल्यानंतर येणारा कोरडेपणा टाळण्यासाठी इच्छित असल्यास तुम्ही त्यात थोडे कोरफडीचे जेल मिक्स करू शकता.

    ॲपल सायडर व्हिनेगर : तुम्ही केस धुण्यासाठी शॅम्पूऐवजी अॅपल सायडर व्हिनेगर, जो एक नैसर्गिक घटक आहे त्याचा वापर करू शकता. कारण यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. त्यामुळे याने केस धुण्यासाठी 2 ते 3 चमचे व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि ते मिश्रण संपूर्ण केसांना लावा. 2ते 3 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.

    बोराच्या झाडांची पाने : तुम्हाला हे कदाचित माहित नसेल, पण तुम्ही बोराच्या झाडांच्या पानांनी सुद्धा केस धुवू शकता. कारण तुम्ही बोराची पाने हातावर चोळल्याने त्याचा फेस तयार होतो. तुम्ही ती पाने वाटून किंवा त्यांचे लहान तुकडे करून केस धुण्यासाठी वापरू शकता. यामुळे तुमची स्कॅल्प निरोगी राहते आणि केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

    अवापुही (झिंगीबर झेरम्बेट) : ही वनस्पती ‘पाईन कोन जिंजर’ किंवा ‘शॅम्पू जिंजर’ म्हणून ओळखली जाते . हे एक सुगंधी कडू आल्याचे फूल आहे, ज्याचा रस नैसर्गिक शाम्पू आणि कंडिशनर म्हणून केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फुलांतून निघणार घट्ट द्रव केसांचा कोरडेपणा दूर करून केसांना मऊ आणि चमकदार बनवतो. त्यामुळे तुम्ही केसांना कंडिशनिंग करण्यासाठी हेअर वॉशमध्ये याचा वापर करू शकता. तुम्ही हे फूल घरी सहजपणे वाढवू शकता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed