मुंबई महापालिकेच्या उपमहापौर अलका केरकर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलका केरकर या दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि वार्ड क्रमांक 98 च्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे आज (21 मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अलका केरकर यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अलका केरकर या भाजपच्या मुंबईतील ज्येष्ठ महिला पदाधिकारी आणि नगरसेविका होत्या. त्या तीनवेळा मुंबई महापालिकेत निवडून आल्या होत्या. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीचा पहिल्यांदाच मोठा विजय होत सत्ता स्थापन झाली. त्यावेळी अलका केरकर यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीत होतं. अलका केरकर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि वॉर्ड क्रमांक 98 च्या संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनमुळे मुंबई भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अलका केरकर यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी बारा वाजता सांताक्रूझ पश्चिमेत लिंकिंग रोड एक्सटेशन येथील सांताक्रूझ हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी (मेफेअर बिल्डिंग १७वा रस्ता सांताक्रुझ, पश्चिम) येथून 22 मार्च सकाळी 11 वाजता नेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजेपासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. यानंतर दुपारी 12 वाजता सांताक्रूझ पश्चिमेतील हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी अलका केरकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली. तिथे जाऊन त्यांनी अलका केरकर यांच्या मुलाची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. तसेच या घटनेबाबत आशिष शेलार यांनी ‘एक्स’वर माहिती दिली आहे.
“मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वार्ड क्रमांक 98 च्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. निवृत्त शिक्षिका असणाऱ्या अलका केरकर यांचा या प्रभागात दांडगा जनसंपर्क होता. साधी राहणी, पक्षाला समर्पीत आयुष्य आणि भ्रष्टाचार विरोधी, अनधिकृतेला कधीच थारा न देणाऱ्या अलका केरकर निष्कलंक आयुष्य जगल्या”, असं आशिष शेलार म्हणाले.
“नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांना आदर्शवत ठरावे असे त्यांचे आयुष्य होते. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणाऱ्या अलकाताईंच्या जाण्याने आमच्या वांद्रे पश्चिम विभागाचे कधीच न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. गेली तीस वर्षे वांद्रे पश्चिममधील जनतेची सेवा आणि भाजपाचे काम मोठ्या संघर्षाने आम्ही केले. त्या संघर्ष काळातील एक महत्त्वाचा शिलेदारच मी आज गमावला आहे. त्यांच्या जाण्याने वांद्रे पश्चिम हे आमचे एक मोठे कुटुंबच आज दु:खात बुडाले आहे”, अशा भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा