• Thu. Jun 18th, 2026

    खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

    ByMH LIVE NEWS

    Mar 17, 2026
    खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

    मुंबई

    आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा आणि इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. त्यासोबतच सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा हा मोठा फटका बसला आहे.

    मुंबई पुण्यातील स्थिती काय?

    गेल्या २८ फेब्रुवारीपर्यंत १६० रुपये किलो असणारे सूर्यफूल तेल आता १७३ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ झाली असून त्याचेही दर वधारले आहेत. घाऊक बाजारात १५ किलोच्या डब्यामागे ३० ते ४० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईच्या एपीएमसी (वाशी) मार्केटमध्ये घाऊक दरातही १० ते १२ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. पुण्याच्या मार्केट यार्डात बाहेरील राज्यांतून येणारी आवक कमी झाल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे डबे महागले आहेत.

    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये खाद्यतेलाचे दर

    खाद्यतेलाचा प्रकारअंदाजे किंमत (प्रति लिटर/किलो)
    सूर्यफूल तेल (Sunflower Oil)₹१७३ – ₹१७८
    सोयाबीन तेल (Soybean Oil)₹१५३ – ₹१५९
    शेंगदाणा तेल (Groundnut Oil)₹१९० – ₹१९४
    पाम तेल (Palm Oil)₹१४५ – ₹१४८
    मोहरी तेल (Mustard Oil)₹२०० – ₹२०४

    महागाईचा दुहेरी फटका

    एकीकडे खाद्यतेलाचे दर वाढत असताना दुसरीकडे घाऊक महागाईचा निर्देशांक (WPI) फेब्रुवारीमध्ये २.१३ टक्के या ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भाज्यांचे दर स्थिर असले तरी अन्न आणि बिगर-अन्न वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच कोकणातील हापूस आंब्याची आवक मर्यादित असल्याने त्याचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा महाग ठरणार असल्याचे चिन्ह आहे.

    दरवाढीची प्रमुख कारणे काय?

    इराण-इस्रायल युद्धामुळे क्रूड ऑईल आणि लॉजिस्टिक खर्च वाढल्याने खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. बंदरांवरून माल परत आल्याने आणि साखळी विस्कळीत झाल्याने किरकोळ विक्रेत्यांकडे साठा मर्यादित आहे. गुढीपाडवा जवळ येत असल्याने मागणीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे, ज्यामुळे किमती अधिक वाढल्या आहेत. यासोबतच बंदरातून माल परत आला असूनही बासमती तांदळाचे दर गेल्या आठ दिवसांत ५ रुपयांनी वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच आवक कमी झाल्यामुळे साबुदाण्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed