सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांसाठी सुरु झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी सुटणार आहे. या उड्डाणपुलाचे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
“विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात काही माध्यमांनी आणि नागरिकांनी टीका केली होती. मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात अजित दादा एका भाषणात म्हणाले होते, ‘आम्ही अभियंता नाही; मात्र अभियंत्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेगाने पूर्ण करणे हे आमचे काम आहे,’ असे स्पष्टपणे सांगत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम पुणेकरांना दिसत आहेत”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठ्या वाढीनंतर आता पुणे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र बनत आहे. गेल्या वर्षभरात देशातील सर्वाधिक जीसीसी स्पेस पुण्यात विकसित झाली असून त्यामुळे शहराचे आर्थिक आणि औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे आहे”, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती
पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे काही मोठ्या शहरांच्या विकासाची गती मंदावल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे पुणे शहराला ‘डी-कंजेस्ट’ करणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुणे आणि परिसरासाठी दोन चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आणि इतर सेवांना बळ दिले जात आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
विद्यापीठासमोरील या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना मान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीदेखील भूमिका मांडली. “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारा समोर आणि गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
या उड्डाणपुलाची रचना एकात्मिक स्वरूपाची असून वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औंध आणि बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प, शिवाजीनगरकडून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल, सेनापती बापट रोडशी जोडणी तसेच अंडरपास यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा
या प्रकल्पाच्या निमित्ताने अजित दादांची आठवण प्रकर्षाने होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, विद्यापीठा समोरील जुना पूल वाहतुकीच्यादृष्टीने अपुरा ठरत असल्याने तो पाडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोरोनाच्या कठीण काळातही पुणेकरांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत हा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आणि त्यामुळे तो विक्रमी वेगाने पूर्ण होऊ शकला.
या एकात्मिक दुमजली उड्डाणपूला बद्दलची माहिती
- उड्डाणपुलाची एकूण लांबी (रॅम्पसह) १७६३.५२ मीटर आहे.
- प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत ₹२७७ कोटी आहे.
- औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
- वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५५ मीटर लांबीचा स्टील गर्डर बसविण्यात आला आहे.
