• Fri. Mar 6th, 2026

    जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 4, 2026
    जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश – महासंवाद

    मुंबई, दि. ४:- जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा (टप्पा-१) मुख्य उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच जिल्ह्यात या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

    छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवनात झाली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे उप जिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, महेश हरिश्चंद्रे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, ७ मार्च, १४ मार्च, १० एप्रिल, ८ मे आणि १४ मे या दिवशी या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून १५ प्रकाराच्या सेवांचा लाभ पात्र लाभार्थीला दिला जाणार असल्याने प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी.

    जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या, शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले शाळेतच उपलब्ध व्हावेत.  यासाठी अधिकारी  कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दाखले याबाबत माहिती देण्यासाठी मुख्याध्यापकांची ऑन लाईन कार्यशाळा घ्यावी.

    शासकीय कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज, निवेदने वेळीच निकाली काढावीत. शासनाने प्रत्येक कामासाठी दिवस, वेळ ठरवून दिलेली आहे. त्यामुळे कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, असे स्पष्ट निर्देश देत जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, ज्या विभागाकडे प्रलंबित प्रकरणे राहतील त्या विभाग प्रमुखावर कारवाई केली जाईल.

    छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा (टप्पा-१)  मध्ये फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अधिकार अभिलेख अद्ययावत करणे, आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  तसेच संजय गांधी निराधार योजना लाभ, दिव्यांग, मिशन वात्सल्य यासह शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

    ००००

    एकनाथ पोवार/स.सं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed