• Sun. Sep 20th, 2026

मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ByMH LIVE NEWS

Feb 28, 2026
मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई

मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी  शासन विविध उपक्रम राबवत आहे. गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देऊन पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास दृढ करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी गणवेश, पाठ्यपुस्तक आदी सुविधा वेळेवर मिळाव्यात, शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, प्रयोगशाळा, वाचनालय आणि खेळाची मैदाने असावीत यावर भर देण्यात येत  आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे  यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील  पटसंख्या वाढविणे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर पदे भरण्याबाबत विधानसभा सदस्य विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात चर्चा करतांना सांगितले, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ आणि ‘पीएम श्री शाळा’ या योजनांच्या माध्यमातून शाळांचे आधुनिकीकरण सुरू आहे. तसेच, शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत 15,000 पेक्षा अधिक शिक्षकांची भरती ‘पवित्र पोर्टल’द्वारे पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे आणि येणाऱ्या काळात कला, क्रीडा विषयाचे शिक्षकही नेमले जातील, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

मराठी भाषेच्या संदर्भात शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल. येत्या दोन वर्षांत म्हणजे 2026-27 पर्यंत राज्यातील मराठी शाळांमधील पटसंख्या किमान 25 टक्क्यांनी वाढलेली दिसेल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेख, प्रविण दटके  यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed