• Sun. Mar 8th, 2026

    Vasai-Virar Ro-Ro Ferry: वसई-विरारमधील जेटीला प्रवाशांची पसंती, 10 महिन्यांत एक लाखाहून अधिक प्रवासी; ठाणे, मुंबईला जाणाऱ्यांना फायदा

    Vasai-Virar Ro-Ro Ferry: वसई-विरारमधील जेटीला प्रवाशांची पसंती, 10 महिन्यांत एक लाखाहून अधिक प्रवासी; ठाणे, मुंबईला जाणाऱ्यांना फायदा

    Marambalpada-Jalsaar Jetty Services: वसई-विरारमधील रहिवाशांना वाहतूक कोंडीसाठी जलमार्गाचा उपाय मिळाला आहे. जलसार-मारंबळपाडा जलवाहतुकीद्वारे 10 महिन्यांत 1 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील जलमार्गाद्वारे पालघर व वसई तालुक्याला जोडणाऱ्या सफाळेजवळील जलसार जेटी ते विरारजवळील मारंबळपाडा जेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जलवाहतुकीचा गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांनी घेतला आहे. या कालावधीत एक लाखाहून अधिक प्रवासी, ७८ हजार ४६० वाहने तसेच ७,५४५ जनावरे या जलमार्गातून सुरक्षित वाहून नेण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर वाहतूककोंडीतही हा जलमार्ग प्रवाशांना आधार ठरत आहे.

    वाहतूक कोंडीला उपाय

    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अनेक वेळा नागरिक व प्रवासी अडकून पडत होते आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. भाईंदर ते नायगाव दरम्यानच्या खाडीवर पूल उभारण्याच्या दृष्टीने तसेच वसई तालुक्यातील विरार जवळील नारिंगी ते पालघर तालुक्यातील सफाळे जवळील जलसार किंवा दातीवरेदरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने तो प्रकल्प रखडला. त्यामुळे नागरिकांना वसई, ठाणे, भाईंदर व मुंबईकडे जाण्यासाठी मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करावा लागत होता.Maharashtra TimesNavi Mumbai News: नवी मुंबईत 150 नव्या बस, मार्चअखेरपर्यंत खरेदी करणार CNG बसगाड्या; मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत सेवा

    दरम्यान, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने ठाणे-भाईंदर जलमार्ग सुरू केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील जलसार ते मारंबळपाडा या जेटींवरून एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत जलमार्गाद्वारे प्रवासी व वाहन वाहतूक नियमितपणे सुरळीत पार पडली. महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाल्याच्या वेळी अनेक प्रवासी, मालवाहू वाहने व अवजड वाहनांनी या जलमार्गाचा वापर करून वेळेची बचत केली आहे.

    इथेही फुकटे प्रवासी

    महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत प्रवासी सुरक्षा, वेळेचे काटेकोर पालन व सुविधा सुधारणा यांना प्राधान्य दिले जात आहे. भविष्यात सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, काही प्रवासी तिकीट न घेता प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले असून, नागरिकांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या जलमार्ग वाहतूक सेवेचा जास्तीत जास्त लाभघ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: वसई-विरारमधून जाणार बुलेट ट्रेन, विरार स्थानकाचा कायापालट; कसा होणार विकास?

    प्रवासी वाहतूक :

    एकूण प्रवासी संख्या : १,००,९६३

    वाहन वाहतूक :

    • सायकल : २६५
    • दुचाकी : ५६,५९८
    • रिक्षा : ३,४८३
    • कार/५ सीटर वाहन : ३,३२०
    • प्रवासी ऑटो रिक्षा :१४,५९६
    • सहाचाकी मालवाहू गाडी : १६८
    • बस/ट्रक : २४
    • दहाचाकी मालवाहू गाडी : ६
    • अवजड मालवाहतूक : २,२२३
    • मेंढी/शेळी वाहतूक : ७,३६७
    • टेम्पो इतर वाहने : १२६
    • गायी/म्हशी/बैल : ५२
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा