• Thu. Jun 11th, 2026

    पवार अन् ठाकरे, जुळेनात आकडे; काँग्रेसचा ठाम पवित्रा, मविआत मोठा पेच, बलिदान कोण देणार?

    पवार अन् ठाकरे, जुळेनात आकडे; काँग्रेसचा ठाम पवित्रा, मविआत मोठा पेच, बलिदान कोण देणार?

    Maharashtra Politics: राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार आहे. सध्याचं संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुती ७ पैकी ६ जागा सहज जिंकू शकते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. महायुतीकडे असलेलं संख्याबळ पाहता ७ पैकी ६ जागा सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात पडू शकतात. तर मविआला केवळ १ जागा मिळेल. त्यासाठीही तीन पक्षांना एकजूट दाखवावी लागेल. एकूण ७ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

    खासदारकीची टर्म संपल्यावर पुढे निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार दोन वर्षांपूर्वी म्हणाले होते. पण अजित पवार यांचं अकाली निधन, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा बारगळलेला विषय यामुळे परिस्थिती बदलली आहे. शरद पवार यांची पक्षाला असलेली गरज पाहता ते राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात. पण त्यासाठी त्यांना शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची गरज लागेल.

    राज्यसभेवर जाण्यासाठी ३७ मतांचा कोटा आहे. शरद पवारांच्या पक्षाकडे केवळ १० आमदारांचं बळ आहे. शिवसेना उबाठाकडे २०, तर काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. दोन्ही पक्षांकडे शरद पवारांपेक्षा अधिक आमदार आहेत. काँग्रेस राज्यसभेसाठी आग्रही आहे. शरद पवार राज्यसभेवर जाणार असतील, तर विधान परिषदेची जागा काँग्रेसला मिळावी, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडली आहे.

    शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. त्यांनी ती माझ्याकडे बोलून दाखवली आहे, असा दावा शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पवार राज्यसभेवर जाणार असेल तर मग शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असं राऊत म्हणाले आहेत.

    राज्यसभेची जागा शरद पवारांच्या रुपात राष्ट्रवादीकडे गेली तर काँग्रेस मे महिन्यात रिक्त होणारी विधान परिषदेची जागा मागणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच असेल. ठाकरेंची विधान परिषदेची टर्म मे महिन्यात संपणार आहे. त्यांना निवडून जाण्यासाठी काँग्रेसची मदत लागेल. पण राज्यसभा, विधान परिषदेच्या जागा सोडून काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नाही. आकड्यांचा खेळ जुळत नसल्यानं सगळा डाव अडकला आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा