Jalgaon News: सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि दोघांमध्ये प्रत्यक्ष हाणामारी सुरू झाली.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या ४-५ वर्षांपासून कार्यरत असलेले शशिकांत पारधी आणि राकेश पाटील या दोन कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती. शनिवारी रात्री ड्युटी वाटपाच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा खटका उडाला आणि नंतर थेट हाणामारीला सुरुवात झाली.
दोघेही गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
या धुमश्चक्रीत दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत, शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्यांच्यावर चोपडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात फॅक्चर झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका
पोलीस स्टेशनमध्येच घडलेल्या या राड्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, सध्या या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू असून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. अंतर्गत वादातून झालेल्या या हाणामारीने पोलिसांच्या शिस्तीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दोघे पोलीस तीन ते चार वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून हेवे -दावे आहेत. काल ड्युटी लावण्यावरून दोघात वाद झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले, असं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी स्पष्ट केलं आहे.
