• Sun. Mar 8th, 2026
    Harshwardhan Sapkal : ‘टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे’, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष बघितलं पाहिजे, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मालेगाव उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतान यांचा फोटो भिंतीवर होता. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. या मुद्द्यावरुन नवा वाद निर्माण झाला होता. असं असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल मोठं वक्तव्य करुन या वादाला आणखी नवं वळण आणल्याचं चित्र दिसत आहे. या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

    हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य काय?

    “छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे, त्यांनी स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने विचार नेला आहे, अगदी त्यांच्यांच मांदियाळीमध्ये, त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, अर्थात भूमीपुत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

    भाजपकडून तिखट प्रतिक्रिया

    हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तिखट शब्दांत सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. “हर्षवर्धन यांनी या वक्तव्यावर माफी मागायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करत सर्वांना समान संधी, समान न्याय दिला. कोणत्याही धर्माबद्दल अत्याचार केला नाही. पण याउलट टिपू सुलतानने मात्र अनेक हिंदूंवर अत्याचार केल्याचे असंख्य दाखले इतिहासात आहेत, ते सपकाळांना माहिती नाही का? काँग्रेसचा मतांसाठी लाचारी करण्याचा जो प्रकार आहे त्यातूनच टिपू सुलतानचं उदात्तीकरण काँग्रेसकडून होतंय. काँग्रेस पक्षाने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, ही वस्तुस्थिती आहे”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

    “कुठल्याही अर्थाने टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांचे समकक्ष असूच शकत नाहीत. टिपू सुलतानचा इतिहास हा अत्याचाराचा, धर्मांतराचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा राज्याला स्वाभिमान देणार आहे. दोघांची तुलना करणं हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं अज्ञान दिसतं”, अशीदेखील टीका केशव उपाध्ये यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा