• Fri. Mar 6th, 2026
    Devendra Fadnavis : ‘हे खपवून घेणार नाही’, देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर संतापले

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. “टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

    “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचं काम जे केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, मोगलांच्या जोखरातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय होते. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करुन दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणं मी या जन्मात बघितलेलं नाही”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    “आम्ही हे बिलकूल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशा पद्धतीने जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर काँग्रेस पक्षानेदेखील कॉग्‌निजन्‌स् घेतला पाहिजे. त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, त्यांनीदेखील त्यांची भूमिका यावर काय आहे? ते सांगितलं पाहिजे”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    “मला असं वाटतं की, हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचंदेखील संशोधन केलं पाहिजे, हा जो नवा इतिहास हे लिहिताय हा इतिहास महाराष्ट्र आणि भारत खपवून घेणार नाही”, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.

    मुलुंड अपघाताच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुलुंडला झालेल्या अपघातावरही प्रतिक्रिया दिली. “मुलुंडमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी जे काम चाललेलं होतं, त्यामध्ये स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत दुर्दैवी एका जणाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या परिवारासोबत आम्ही आहोत. त्यांच्या परिवारासोबत आमच्या प्रार्थना आहेत. जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची सगळी काळजी एमएमआरडीए आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    “या संपूर्ण प्रकारात जी काळजी घेतली जायला हवी होती ती घेतली होती की नाही याची संपूर्ण चौकशी केली जाईल. अर्थात ती घेतली असती तर अशी वेळ आली नसती. यामध्ये कोण जबाबदार आहे, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललं आहे त्याचं सेफ्टी ऑडिट करुन तात्काळ जिथे काम चालू आहे, तिथलं सेफ्टी ऑडिट करुन अशी घटना घडणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील. मृतकांच्या परिवारांना शासनाच्या वतीने मदत केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा