• Sat. Mar 7th, 2026

    ‘वंदे भारत’मध्ये साप! शौचालयात धामण सोडून पळून गेलेला माथेफिरु

    ByMH LIVE NEWS

    Feb 14, 2026
    ‘वंदे भारत’मध्ये साप! शौचालयात धामण सोडून पळून गेलेला माथेफिरु
    मुंबई 
    वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आली आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारतमधील स्वच्छतागृहात डिसेंबरमध्ये अडीच फुटी साप (धामण) आढळला होता. प्रवाशांमध्ये भीती पसरवण्यासाठी हा साप सोडण्यात आला होता. हे कृत्य करणाऱ्याला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.नेमकं काय घडलेलं?
    गाडी क्रमांक २२२२५ मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सी-१६ डब्यातील स्वच्छतागृहात साप दिसल्याची तक्रार प्रवाशांनी २७ डिसेंबर रोजी केली. गाडीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने स्वच्छतागृह बंद केले आणि त्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. साप वंदे भारतमध्ये कसा पोहोचला, याचा तपास सुरू करण्यासाठी गाडीतील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. यामध्ये आरोपी जगन भोले हा ठाणे स्थानकात गाडीत साप सोडत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

    कर्जत स्थानकात प्रवाशांना साप दिसल्याचे लक्षात येताच स्वच्छतागृहाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यावेळी साप आढळला नाही. त्यानंतर पुणे स्थानकात तपासल्यावरही तो सापडला नाही. अखेर सोलापूरला पोहोचल्यावर सर्पमित्राच्या मदतीने सापाला बाहेर काढण्यात आले.

    गुन्ह्याची कबुली, १४ दिवसांची कोठडी
    दरम्यान, वंदे भारतसह रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही आणि खबरींच्या माध्यमातून भोलेचा शोध सुरू करण्यात आला. मूळचा नाशिकचा रहिवासी असलेला भोले मुंब्रा येथे असल्याची माहिती तापासात पुढे आली. त्यानुसार सापळा रचून गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासाठी साप सोडल्याची कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणी रेल्वे कायद्यानुसार कलम १४५(बी), १४७ आणि १५३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भोलेला कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.देशातील नववी वंदे भारत
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले. ही देशातील नववी वंदे भारत ठरली. ही गाडी १० फेब्रुवारीपासून प्रवासी वाहतुकीसाठी धावू लागली. सुरुवातीला १६ डब्यांसह धावणाऱ्या या वंदे भारतला प्रवासी प्रतिसाद वाढल्याने ऑगस्ट २०२५मध्ये तिचा २० डब्यांपर्यंत विस्तार करण्यात आला. आठवड्यातून सहा दिवस धावणाऱ्या सोलापूर वंदे भारतला जानेवारी २०२६पर्यंत एकूण १०२.२७ टक्के प्रवासी भारमान आहे. आतापर्यंत २३ लाख ४३ हजार ५९८ प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला आहे. गाडी क्रमांक २२२२६/५ सोलापूर-सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ४५५ किमी अंतर फक्त सहा तास ३० मिनिटांत पूर्ण करते. अन्य अतिजलद गाड्यांना याच अंतरासाठी सात तास ५५ मिनिटे लागतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed