उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या एकदिवस आधी काय घडलं होतं? याबाबत रोहित पवार यांनी मोठा दावा केला होता. अजित पवार यांना पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला होता, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर नुकतंच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला होता. अजित पवार हे गाडीने रस्ते मार्गाने मुंबईहून पुण्याला जाणार होते. पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला. त्या नेत्याच्या फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार यांना थांबावं लागलं. ती फाईल मंत्रालयातून देवगिरी बंगल्यावर मागवण्यात आली. या सगळ्या घडामोडींमध्ये वेळ गेला आणि अजित पवार यांचा रस्ते मार्गाने बारामती जाण्याचा निर्णय रद्द झाला. यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे अजित पवार यांचा विमानाने बारामती जाण्याचा निर्णय घेण्यात आला, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. रोहित पवार यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी शोकसभेत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर शोकसभेचं आयोजन केलं होतं. या शोकसभेत सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्ते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रमोद हिंदूराव यांनी अजित पवार यांच्याविषयी भावनिक आठवणी सांगितल्या. याचवेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं.
प्रमोद हिंदूराव नेमकं काय म्हणाले?
“अजित पवार यांचं रस्त्याने बारामतीला जाण्याचा निर्णय झाला होता. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब किंवा कुणाचा तरी त्यांना फोन आला होता की, साहेब माझं काम अडलं आहे काहीतरी फाईल क्लिअर करायची आहे. त्यांनी लगेच फोन लावला आणि फाईल आणायला सांगितली. फाईल यायला साडेसात वाजले. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की, त्या बॅगा परत काढा. उद्या सकाळी विमानाने जाणार असं सांगितलं आणि त्या बॅगा परत गाडीतून काढायला लागल्या”, असा दावा प्रमोद हिंदूराव यांनी केला आहे.
“दुसऱ्या दिवशी विमानाने पाच लोकं बारामतीला गेले. बॉडीगार्ड जाधव कधीच अजित दादांच्या शेजारी बसला नव्हता. त्या दिवशी तो पहिल्यांदा अजित दादांच्या शेजारी बसला होता. त्याचा फोटो काढून त्याने घरच्यांना पाठवला होता. त्याला कधीच आयुष्यात वाटलं नसेल की, माझं असं होईल”, असंदेखील प्रमोद हिंदूराव म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा