मुलगी जान्हवी ही बारावीत असून तिची मंगळवारी बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता हौशीलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. दु:खावर मात करत मनामध्ये वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता जान्हवीने वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. तर जान्हवी ही तुमसर येथील जनता शाळेतील परीक्षा केंद्रावर पेपर द्यायला निघाली. या दोन घटनांमुळे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पुण्यात सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
दुसरीकडे, देशसेवेसाठी कर्तव्य बजावून आपल्या कामासाठी गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी-देवकर येथील तोंडेवस्तीजवळ रस्ता ओलांडताना भरघाव वाहनाच्या धडकेत मराडेवाडीचे (ता. इंदापूर) सुपुत्र आणि सीआरपीएफ जवान महादेव दादा नाझीरकर (वय ३४) यांचा मृत्यू झाला.
महादेव नाझीरकर हे सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याने ते मुंबईत वास्तव्यास होते. रविवारी रात्री ते सुट्टीवर आपल्या गावी मराडेवाडी येथे आले होते. त्यांचे वडील त्यांना घेण्यासाठी आलेले असता, रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.
मुलगा सुट्टीवर आल्याने वडील दादा लक्ष्मण नाझिरकर रात्री त्यांना घेण्यासाठी आले होते. मात्र, वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या काळजाचा तुकडा काळाच्या पडद्याआड गेला. अपघात झाला तेव्हा महादेवचे वडील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होते. आपल्या लेकाचे घरी येणे ते डोळे भरून पाहत होते; पण पुढच्याच क्षणी अज्ञात वाहनाने महादेवला चिरडले. या धक्कादायक प्रसंगामुळे पित्याला मोठा मानसिक धक्का बसला.