• Wed. Mar 11th, 2026
    Sunetra Pawar यांना जबरदस्ती उपमुख्यमंत्री केलं का? सुनील तटकरे म्हणाले…

    आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही मोठे दावे केले आहेत. त्या दाव्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी दिल्ली : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुनील तटकरे यांनी अनेक प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही दावे केले. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नव्हत्या असा थेट उल्लेख आमदार रोहित पवार यांनी केल्याचं पत्रकारांनी सुनील तटकरे यांना सांगितलं. त्यावर सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली.

    “जो निर्णय झाला तो सहमतीने झाला. पक्षामध्ये सहमतीने झाला. आता त्याबद्दल भाष्य करण्याचा इतारांना काय अधिकार? कारण हा राजकीय निर्णय आहे. राजकीय निर्णय घेण्याचा राजकीय पक्षाला अधिकार आहे.आमचा राजकीय पक्ष हा भारतीय निवडणूक आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाला मान्यताप्राप्त आहे, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्व अधिकार आमचा आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

    “सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला का? असा प्रश्न सुनील तटकरे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. राजीनामा दिलेला नाही, कारण उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असल्यामुळे त्यांची भेट घेणं हा आजच्या भेटीमागचं कारण होतं”, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.

    सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा का दिला नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर “कुठल्याही व्यक्तीला राज्याचे किंवा देशाचे मंत्री होत असताना सहा महिने त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा अवधी असतो. अशावेळेला दुसऱ्या सभागृहाचं सदस्यत्व त्यांच्याकडे असेल तर तेही कायद्यान्वे ठेवता येतं. अजित पवार 1991 खासदार झाले. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे केंद्रीय संरक्षण मंत्री झाले. त्यावेळी अजित पवार राज्यात सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात जावून राज्यमंत्री झाले. मी अजित पवार यांचं उदाहरण का दिलं? कारण आज त्या परिवाराशी निगडीत असलेल्या प्रश्न आहे म्हणून त्यांचं उदाहरण दिलं”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

    अजित पवार यांच्या अपघातावर रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली. त्याबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. “अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी भारत सरकारने आणि राज्य सरकारने करावी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची आहे. युरोपीयन कंपनीकडे तपास दिला होता का? कुणी फोन केला? ते मला माहिती नाही. त्यांनी कुणाचा फोन गेला, काय गेला, तपास यंत्रणांमध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकर असल्याने त्यांच्याकडे अधिक माहिती असेल”, असा टोला तटकरे यांनी लगावला.

    “रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा. तर मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ ही 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजेची होती. ती भेट पावणे सात वाजता संपली. ती भेट तीन दिवस आधी ठरली होती. कारण दोन दिवस अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर होते, मी रायगडच्या दौऱ्यावर होतो”, असंदेखील सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा