• Sun. Jun 7th, 2026
    Mayor Election: राजकीय उलथापालथ! भाजपने ठाकरेंना आपल्याकडे खेचलं, वंचित आणि MIM लाही जवळ केलं; शेवटच्या क्षणी काय घडलं?

    Chandrapur BJP News: ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी महापौरपद भाजपकडे राहील, तर त्यानंतर पुढील सव्वा वर्षासाठी शिवसेना (उबाठा) गटाकडे महापौरपद दिले जाईल.

    राजकीय उलथापालथ! भाजपने ठाकरेंना आपल्या खेचलं, वंचित आणि एमआएमलाही जवळ केलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर या अवघ्या एका मताच्या फरकाने महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. वंचितचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आणि एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. या निकालामुळे चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून, काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीचा थेट फायदा भाजपला झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे.

    या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष यांच्यात युती झाली असून, त्यानुसार महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. भाजप नेते किशोर जोरगेवार यांनी युतीची अधिकृत घोषणा करताना सांगितलं की, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या काही नगरसेवकांचा समावेश असलेली आघाडी सत्तास्थापन करणार आहे.

    जोरगेवार यांनी सांगितलं की, भाजपकडे २४ नगरसेवक असल्याने पहिला महापौर भाजपचाच असणे अधिक योग्य होते. चंद्रपूरचा विकास भाजपच करू शकतो, हे अनेक नगरसेवकांना पटले आणि त्यामुळे ते आमच्यासोबत आले, असा दावा त्यांनी केला. संगीता खांडेकर यांच्या नावाने पक्षाने अधिकृत व्हीप काढला होता आणि त्यानुसार मतदान झाले.

    दरम्यान, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना सांगितलं की, सुरुवातीपासूनच शिवसेनेची भूमिका महापौरपदासाठी ठाम होती. काँग्रेससोबत चर्चा सुरू असतानाही पाच वर्षांत एकदाही महापौरपद देण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली नाही. त्यामुळे भाजपशी चर्चा करून नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद पाचही वर्षे शिवसेनेकडे राहील, तर स्थायी समिती अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी शिवसेनेला दिले जाईल.

    दरम्यान, या सत्ताबदलामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकीकडे भाजप शिवसेना (उबाठा) युती सत्तेवर येत असताना, दुसरीकडे काँग्रेसला अंतर्गत कलहाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. आगामी काळात या नव्या युतीकडून शहराच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा