Solapur Love Affair News: शनिवारी सकाळी हा तरुण एका लॉजमधील रूममध्ये छताच्या फॅनलला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिश बंडीचे नात्यातीलच एका मुलीशी सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या घरात कळाल्यानंतर त्यांनी हरिशसोबत संबंध ठेवू नको, असं सांगत मुलीचा संपर्क बंद केला. प्रेयसीने संपर्क तोडल्याने हरिश मानसिक तणावात होता. ही बाब कळाल्यानंतर हरिशच्या कुटुंबीयांनी मागणीसाठी दोन ते तीन वेळा त्या मुलीच्या घरी गेले. मंगळवारी हरिशचे कुटुंबीय पुन्हा मुलीच्या घरी गेले, तेव्हाही पाणउतारा करत त्यांना हकलून देण्यात आल्याचा आरोप. अपमानास्पद वागणूक दिल्याने हरिश बंडी हा मानसिक तणावात होता.
कुणालाही काही एक न सांगता निघून गेला
प्रेयसीचा विरह सहन होत नसल्याने हरिश बुधवारी घरातून न सांगता निघून गेला. हरिशच्या कुटुंबीयांनी तो हरवल्याची तक्रारही सोलापुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवार ४ फेब्रुवारी रोजी दिली होती. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेत होते, पण तो आढळून आला नाही. नंतर त्याचा मृतदेह लॉजमध्ये आढळून आला.
हरिश बंडी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. नात्यातील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र नंतर अचानक संपर्क बंद केला. यातूनच तो मानसिक तणावात गेला होता. त्या मुलीने “मी तुझ्या शिवाय कोणाशीही लग्न करणार नाही,” म्हणून वचन दिलं होतं. यामुळे हरिश शेवटपर्यंत एकच म्हणत होता, मला फक्त तिला बघायचंय. तिच्या तोंडून मला उत्तर ऐकायचं आहे, असं हरिशच्या बहिणीने सांगितले.
प्रेयसी आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करा
हरीषचा वापर त्या सर्वांनी केला. त्याच्याजवळील पैसे संपेपर्यंत त्याचा वापर केला. त्यानंतर त्याला सोडून गेले. आम्ही हाता-पाया पडलो पण तरीही मुलगी देण्यास नकार दिला. त्याचा फायदा घेतला. यापुढे मुलांचा अशा प्रकारे वापर होऊ नये, यासाठी ती मुलगी, तिचे आई, वडील, भाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हरिशच्या नातेवाईकांनी केली आहे.
