• Fri. Mar 6th, 2026

    Sunil Tatkare : ‘सुनेत्रा पवार येत्या 10 तारखेला मुंबईत, चर्चा करुन निर्णय घेऊ’, सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य

    Sunil Tatkare : ‘सुनेत्रा पवार येत्या 10 तारखेला मुंबईत, चर्चा करुन निर्णय घेऊ’, सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य

    “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या 10 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. या दिवशी चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाबाबत वेगवेगळे दावे, प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. येत्या 10 तारखेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुंबईत येणार आहेत. त्यावेळी आम्ही सर्वजण चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.

    “हसन मुश्रीफ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सर्वांनी अजित दादांच्या नेतृत्वात एनडीएत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी या विषयाच्या चर्चा आम्ही सखोलपणाने चर्चा करु. येत्या 10 तारखेला मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार त्या ठिकाणी येतील. त्यानंतर आम्ही या विषयावर चर्चा नक्कीच करु”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

    “सुनेत्रा पवार या कदाचित दिल्लीतदेखील येऊ शकतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्या कदाचित दिल्लीतही येऊ शकतात. त्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्याबाबत काही वैधानिक जबाबदाऱ्या आहेत, त्याबाबत आम्ही योग्य वेळी चर्चा करुन निर्णय घेऊ. आम्ही सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित दादांचा परिवार आहे. परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे. अन्यथा याच विषयावर कुणी टीका टीप्पणी करेल”, असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं.

    सुनील तटकरेंचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी टीका केली होती. रामदास कदम यांनी या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    “रामदास कदम यांच्या गलिच्छ वक्तव्यावर मी बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावर चिखल ओढवून घेणं. त्यांना त्यांचं करु द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने अजित दादांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीत 41 जागांवर बहुमतात आलो आहोत. त्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा आमचा अधिकार आहे. त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली? तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यांना कधी त्याबाबत फार विचारलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं.

    “मला ए आर अंतुले साहेबांचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्यामुळे माझ्याकडून अंतुले साहेबांच्या बद्दल कधीही कटुतेचं शब्द आला नाही. उद्याच्या काळात तसे शब्द येण्याचे कारण नाही. आमची संस्कृती ही वडिलधाऱ्यांचा आदर, जनमाणसांमध्ये काम करताना प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर हे गेल्या 45 वर्षांच्या माझ्या राजकीय आयुष्याची शिदोरी असल्यामुळे कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही. कारण माझ्या राजकीय कारकीर्दीत जनतेचं मला पूर्णपणे पाठबळ मिळालं आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.

    रामदास कदम नेमकं काय म्हणाले होते?

    “अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांना शह देण्यासाठी जे गलिच्छ राजकारण केलं, अजित दादांची स्मशानातील राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती, असं असताना वहिणींना मंत्रालयात बोलवून मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. 10 दिवस गेले असते तर काय झालं असतं? हा माणूस किती चाणाक्ष आहे ते बघा. त्याला असं वाटलं की, शरद पवार पक्षावर ताबा घेतील”, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा