• Fri. Jun 19th, 2026

    राज्यातील 12 जिल्ह्यांत मतदानाचा उत्साह; किती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान

    ByMH LIVE NEWS

    Feb 7, 2026
    राज्यातील 12 जिल्ह्यांत मतदानाचा उत्साह; किती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान

    मुंबई

    संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजले असून आज १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. राज्यातील ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एकूण ७३१ जिल्हा परिषद गट आणि १ हजार ४६२ पंचायत समिती गणांसाठी मतदान होत आहे. या महासंग्रामात ७ हजार ४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. यासाठी सुमारे २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    किती जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतदान?

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात किती जिल्हा परिषद गट (जागा) आणि किती पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे, याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.

    अनुक्रमजिल्हाजिल्हा परिषद गट (जागा)पंचायत समित्यांची संख्या
    पुणे७३ जागा१३ पंचायत समित्या
    सोलापूर७२ जागा११ पंचायत समित्या
    कोल्हापूर६७ जागा१२ पंचायत समित्या
    सातारा६४ जागा११ पंचायत समित्या
    छत्रपती संभाजीनगर६३ जागा९ पंचायत समित्या
    सांगली६१ जागा१० पंचायत समित्या
    रायगड५९ जागा१५ पंचायत समित्या
    लातूर५८ जागा१० पंचायत समित्या
    रत्नागिरी५६ जागा९ पंचायत समित्या
    १०धाराशिव५५ जागा८ पंचायत समित्या
    ११परभणी५३ जागा९ पंचायत समित्या
    १२सिंधुदुर्ग५० जागा८ पंचायत समित्या
    एकूण७३१ जागा१२५ पंचायत समित्या

    मतदारांना दोन मते द्यावी लागणार

    जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २,६२४ उमेदवार रिंगणात आहे. तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ४,८१४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. जिल्हा परिषदेत ३६९ तर पंचायत समित्यांमध्ये ७३१ जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रशासनाने २५,४७१ मतदान केंद्रे उभारली असून, १ लाख २८ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरक्षेसाठी राज्यभर मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे. यावेळी मतदारांना दोन मते द्यायची आहेत. जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाचे आणि पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाचे बॅलेट युनिट मतदान केंद्रावर उपलब्ध आहे.

    निकाल कधी?

    आज सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान पार पडणार आहे. या सर्व जागांचा निकाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होईल. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत कोणत्या जिल्हा परिषदेवर कोणाची वर्णी, कोणती पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed