• Tue. Jun 30th, 2026

    पुणे महापालिकेच्या ‘तिजोरीच्या चाव्या’ कोणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    पुणे महापालिकेच्या ‘तिजोरीच्या चाव्या’ कोणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच
    पुणे
    पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत सिद्ध केले असून, आता पालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महापालिकेचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या ‘ स्थायी समिती ‘च्या अध्यक्षपदाकडे वळल्या आहेत.
    पक्षाने महापौरपदाची जबाबदारी मंजुषा नागपुरे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची निवड पक्की मानली जात आहे. यासोबतच सभागृह नेते म्हणून गणेश बिडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्य पदांचे वाटप झाल्यानंतर आता इतर महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पक्षात लॉबिंग सुरू झाले आहे.

    महापालिकेच्या आर्थिक नाड्या आणि विकासाचा निधी मंजूर करण्याचे अधिकार स्थायी समितीकडे असतात, त्यामुळे हे पद राजकीयदृष्ट्या अत्यंत वजनदार मानले जाते. या महत्त्वपूर्ण खुर्चीसाठी भाजपमध्ये सध्या जोरदार चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये श्रीनाथ भिमाले आणि बॉबी ऊर्फ अनिल टिंगरे ही दोन नावे या स्पर्धेत सर्वात आघाडीवर आहेत. या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. तर गेल्या टर्ममध्ये स्थायी साठी इच्छुक असणाऱ्या आबा शिळीमकर यांच सुद्धा नावं स्थायी साठी शर्यतीत आहे.

    मागील चार वर्षे महापालिकेवर प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधींचा थेट सहभाग नव्हता. आता स्पष्ट बहुमतासह सत्तेत आलेल्या भाजपसमोर पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना दिलेल्या ‘विकासाच्या गॅरंटी’ची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे.

    शहरातील रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणे. हे मोठे आव्हाने सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहेत.

    त्यामुळे नवीन स्थायी समिती अध्यक्षांवर या विकासकामांसाठी निधीचे नियोजन करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे भाजप हायकमांड या पदासाठी कोणाची निवड करते, यावर पुणे शहराच्या आगामी आर्थिक नियोजनाची दिशा ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed