चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. गेले अनेक दिवस चर्चेत असलेला काँग्रेस पक्षाचा गट नोंदणीचा वाद अखेर संपुष्टात आला असून काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी अधिकृतरित्या एकत्र येत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी पूर्ण केली. या प्रक्रियेदरम्यान राजेश अडूर यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी अधिकृत नोंद करण्यात आली. या घडामोडीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये आता सर्व काही सुरळीत असून कोणताही वेगळा गट अस्तित्वात नसल्याचा दावा पक्षाने केला आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेत सर्व २७ नगरसेवक हे एकसंघपणे काँग्रेसच्या गटात असून येत्या १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीचाच महापौर होणार, याबाबत पक्षाला पूर्ण विश्वास आहे.गट नोंदणीच्या वेळी बोलताना काँग्रेस गटनेते राजेश अडूर म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. आज आम्ही सर्वांनी एकत्र येत नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी केली आहे. हा गट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, तसेच राज्याचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसच्या या गटाला मित्र पक्षांचाही पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष काँग्रेससोबत ठामपणे उभे आहेत. तसेच जनविकास पक्षाचे नगरसेवकही काँग्रेसला पाठिंबा देत असल्याने चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच, म्हणजेच महाविकास आघाडीचाच महापौर होणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर महापौर पदासाठी कोणाची निवड होईल, याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. यासाठी काँग्रेसकडून तीन ते चार उमेदवारांचे नामांकन फॉर्म भरून ठेवण्यात आले आहेत. तसेच उपमहापौर पदासाठी दोन फॉर्म सादर करण्यात आले असून, याबाबतचा निर्णयही पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. महापौर पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी उमेदवार दिल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना अडूर म्हणाले की, चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवली गेली असून आघाडीतील सर्व पक्ष काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे कोणताही संभ्रम राहिलेला नाही.
अडूर यांनी सांगितलं की, पक्षातील सर्व वाद आता पूर्णपणे संपले असून सर्व गट एकत्र आले आहेत. पुढील काळात निवडून आलेले सर्व २७ नगरसेवक एकत्र राहून चंद्रपूर शहराच्या विकासासाठी काम करतील. सध्या काँग्रेसमध्ये आनंदी वातावरण असून, स्थैर्य आणि एकजूट याच्या बळावर महापालिकेत सत्ता स्थापण्याचा पक्षाचा निर्धार आहे.