• Tue. Jun 16th, 2026
    Parth Pawar: जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना क्लीन चिट? मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट, चौकशी समितीने आम्हाला…

    Pune Land Scam: पार्थ पवार प्रकरणात चौकशी समितीला मुदतवाढ मिळाल्यामुळे या तपासात काही नवे धागेदोरे हाती लागणार आहेत का, याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

    जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना क्लीन चिट? मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राजकीय वर्तुळात काही महिन्यांपूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या पार्थ पवार यांच्याशी संबंधित कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सस्पेन्स आता अधिकच वाढला आहे. कारण पार्थ पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याची चर्चा असताना “या प्रकरणाचा कोणताही अधिकृत अहवाल अद्याप सरकारकडे प्राप्त झालेला नाही,” असं सांगत भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पार्थ पवार यांना तूर्तास कोणतीही ‘क्लीन चिट’ मिळालेली नसून, चौकशीचा फेरा आता पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर पडला आहे.

    भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या खारगे समितीने सरकारकडे ७ दिवसांची अधिक वेळ मागितली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून, आता पुढील ८ दिवसांच्या आत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “अहवाल माझ्याकडे आल्याशिवाय यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही,” असे बावनकुळे यांनी नमूद केले. चौकशी समितीला मिळालेल्या या मुदतवाढीमुळे तपासात काही नवीन धागेदोरे हाती लागले आहेत का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

    महायुतीत अस्वस्थता की केवळ प्रक्रिया?

    दुसरीकडे, या प्रकरणावरून महायुतीमध्ये सावधगिरीचे वातावरण पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, अजित पवार यांच्या पक्षाबद्दल किंवा त्यांच्या नेत्यांबद्दल कोणतेही चुकीचे विधान करू नका. एकीकडे पार्थ पवारांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे महायुतीचा धर्म पाळण्यासाठी भाजप नेत्यांकडून होणारी ही ‘डॅमेज कंट्रोल’ची कसरत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आता ८ दिवसांनंतर येणाऱ्या अहवालात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा