• Sun. Aug 16th, 2026

Beed Crime: खळबळजनक! बीडमध्ये दगडाने ठेचून तरुणाची हत्या, दोन पोलीस ठाण्यांच्या सीमेवरच थरारक घटना, नेमकं कारण काय?

ByMH LIVE NEWS

Feb 2, 2026
Beed Crime: खळबळजनक! बीडमध्ये दगडाने ठेचून तरुणाची हत्या, दोन पोलीस ठाण्यांच्या सीमेवरच थरारक घटना, नेमकं कारण काय?

 बीड 

जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज सोमवारी पहाटेच्या सुमारास शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरात एका ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव गुड्डू तांबोळी (वय अंदाजे ३० वर्षे, रा. रायमोहा, ता. शिरूर कासार) असे आहे. ही घटना शिरूर कासार आणि पाटोदा या दोन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर असलेल्या रायमोहा गावातील डोंगर देवी शिवारात घडली. प्राथमिक अंदाजानुसार, आज सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गुड्डू तांबोळी यांच्यावर हल्ला केला. अत्यंत क्रूरपणे त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली.

घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक लॅब दाखल

सकाळी परिसरातून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा रक्ताने माखलेला मृतदेह आला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच शिरूर कासार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. घटनेची भीषणता पाहता तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.

वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही काळापासून हत्येच्या आणि गंभीर हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रायमोहा हे गाव दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीवर असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गुड्डू तांबोळी यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, जुना वाद होता की अन्य काही कारण, याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांचा धाक उरला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून लवकरच आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed