• Mon. Jun 15th, 2026

    संत निवृत्तीनाथ महाराजांचे विचार समाजजीवनासाठी मार्गदर्शक : केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 1, 2026
    संत निवृत्तीनाथ महाराजांचे विचार समाजजीवनासाठी मार्गदर्शक : केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत – महासंवाद

    नाशिक, दि. ३१ जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : संत निवृत्तीनाथ महाराजांनी योगसाधनेच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा सर्वोच्च अनुभव प्राप्त केला. त्यांनी अध्यात्म हे केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवले. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले.

    त्र्यंबकेश्वर येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसरातील प्रशासकीय इमारत व दर्शनबारी मंडप लोकार्पण कार्यक्रम आज पार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, खासदार भास्कर भगरे, पर्यटन विभागाचे स्थापत्य अभियंता महेश बागुल, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

    केंद्रीय मंत्री श्री. शेखावत म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज यांनी अध्यात्माचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आणि भक्ती व ज्ञान यांचा सुंदर संगम घडला.
    संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाजाला दिलेला संदेश साधा पण प्रभावी होता. त्यांचे कार्य केवळ आध्यात्मिक नव्हते, तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण होते. त्यांनी समाजात समता, बंधुता आणि सदाचार यांचे बीज रोवले.

    संतांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण विकसित भारताकडे वाटचाल करीत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र पुरस्कृत प्रसाद योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांमध्ये येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा देऊन त्या ठिकाणांचा नियोजित आणि शाश्वत विकास करण्यात येत आहे. या योजनेतून संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसरातील प्रशासकीय इमारत व दर्शनबारी मंडपाचे काम करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात उर्वरित कामेही प्रसाद योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कोनशिला अनावरण झाले.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed