नाशिकमधलं प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात भाषण करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही. यामुळे संतापलेल्या महिला वनरक्षक माधवी जाधव यांनी आपल्या जागेवरुन त्यांना जाब विचारला. यानंतर आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
माधवी जाधव नेमकं काय म्हणाल्या?
“बाबासाहेब संविधानाला कारणीभूत आहेत. त्यांना तुम्ही संपवायला निघालेत. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी याची माफी मागणार नाही. पण पालकमंत्र्यांनी त्यांचीही चूक पदरात घ्यावी. मॅडम मला मीडियाशी घेणंदेणं नाही. मला सस्पेंड केलं तर मी वाळूच्या गाड्या उपसेन. मी माती काम करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही”, अशी भूमिका माधवी जाधव यांनी मांडली.”मला सस्पेंड करायचं तर करु शकता. मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. 25 जानेवारी, 15 ऑगस्टमध्ये मी नाही मानत, पण लोकशाही… मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्रीसुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत. कोणताही जीतीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमचे काम आतुरेत होते. आत्तातरी बाबासाहेबांचं नाव भाषणात येईल. जो संविधानाला कारणीभूत आहे, जो प्रजासत्ताक दिनाचा मानकरी आहे, त्यांचं नाव भाषणात का नाही?”, असा जाब माधवी जाधव यांनी विचारला.
गिरीश महाजन यांनी व्यक्त केली दिलगिरी
माधवी जाधव आक्रमक झाल्यानंतर सर्वत्र या घटनेची चर्चा होऊ लागली. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. “अनावधानाने राहिलं असेल. माझा तसा काही कुठला हेतू नव्हता. त्यामध्ये मी फक्त घोषणा दिल्या की, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्… बरोबर आहे. तसं काही असेल तर ते अनावधानाने झालं असेल. माझा त्यामागे मुद्दाम नाव डावलण्याचा हेतू नव्हता. मला वाटतं, प्रत्येक वेळेला मी भाषण करतो तेव्हा असं काही होत नाही. पण या वेळेला त्यांना काही वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली.
गिरीश महाजन विरोधकांच्या टार्गेटवर
दरम्यान, या घटनेनंतर गिरीश महाजन हे विरोधकांच्या टार्गेटवर आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. “भाजपचे लोक संविधानाला मानणारे नाहीत”, अशी टीका त्यांनी केली.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वनरक्षक माधवी जाधव यांना फोन करुन विचारपूस केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तर गिरीश महाजन यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.
गिरीश महाजन यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
या घटनेप्रकरणी वनरक्षक माधवी जाधव यांनी नाशिकमध्ये सरकारवाडी पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
