• Tue. Mar 10th, 2026

    समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री डॉ. वुईके

    ByMH LIVE NEWS

    Jan 26, 2026
    समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री डॉ. वुईके

    चंद्रपूर, दि. 26

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, आदिवासी, वंचित यांच्यासह दुर्बल घटकांना विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा प्रशासन दुर्बल घटकाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करीत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी काढले.

    पोलिस मुख्यालय येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत एकूण 3 लक्ष 33 हजार (100 टक्के) शेतकर्‍यांचा फार्मर आयडी तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 1073 गावातील 8257 हेक्टर झुडपी जंगल जमीन, वन जमीन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे 571 गावांचे डिलिस्टींगचे प्रस्ताव आणि अतिक्रमित जमिनीचे 149 गावांचे प्रस्ताव असे एकूण 720 गावनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. यापैकी 249 प्रस्ताव वन विभागास सादर केले आहे.

    ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजने’ अंतर्गत जिल्ह्यातील 209 महिलांना विविध योजनांद्वारे 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या आदि कर्मयोगी अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 167 गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन अंतर्गत 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आणि 14 हजार 100 रोजगार निर्मिती होण्याबाबत करार झाले आहेत. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेत 3526 घरकुल तर ग्रामीण आवास योजनेत 46 हजार 381 घरकुल पूर्ण झाले आहे.

    पुढे पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, चंद्रपूर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील किडनी रॅकेट प्रकरण उघडकीस आणले व त्यातील आरोपींना देशातील विविध भागातून अटक करुन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. घरी आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या समक्ष गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग दूरीकरण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पुर्वी मुख्य शासकीय कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला.

    उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा सत्कार
    विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, खेळाडू व नागरिकांचा यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघडकीस आणणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचारे व त्यांचे सहकारी, उत्कृष्ट तपासाबद्दल सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे, व्हॉलीबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेली खेळाडू सखी दोरखंडे, दृष्टीहीन बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेला वेद नीरज पौर, राष्ट्रीय रायफल शुटींग चॅम्पियनशीपमध्ये प्रथम आलेली प्रेरणा मोरे, राज्य ऑलिंपिक संघटनेत निवड झाल्याबद्दल डॉ. राकेश तिवारी यांचा समावेश होता.

    540 विद्यार्थ्यांचे भव्य कवायत संचलन
    26 नोव्हेंबर संविधान दिन व 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये, संस्कृती व इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत देशभक्तीपर गीतांवर आधारित शालेय विद्यार्थ्यांचा कवायत संचलन कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात आला. जिल्हा पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात 540 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर भव्य कवायत संचलन केले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या सुमारे 2500 शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शहरातील निवडक 9 शाळांमधील 540 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर प्रभावी कवायत संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

    या कवायतीसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांनी नोडल ऑफिसर म्हणून तर शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा पिपरे व संजय हेडाऊ यांनी सहायक नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडली. कवायतीचे नेतृत्व एन. सी. सी. ऑफिसर मोरेश्वर बारसागडे यांनी केले. तसेच प्रदीप कळसकर, सुनील माहुरे व साहिल चहारे यांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण कवायत सादर केली.

    सहभागी झालेल्या शाळा : चंद्रपूर येथील हिंदी सिटी हायस्कूल (60 विद्यार्थी), भवानजीभाई चव्हाण हायस्कूल (60 विद्यार्थी), लोकमान्य टिळक कन्या विद्यालय (60 विद्यार्थी), लोकमान्य टिळक विद्यालय (60 विद्यार्थी), बी.जे.एम. कार्मेल कॉन्व्हेंट (90 विद्यार्थी), मातोश्री विद्यालय (60 विद्यार्थी), विद्याविहार कॉन्व्हेंट (60 विद्यार्थी), प्रियदर्शनी कन्या विद्यालय (30 विद्यार्थी) आणि छोटूभाई पटेल हायस्कुल (60 विद्यार्थी) यांचा समावेश होता.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed