• Thu. Jun 18th, 2026

    गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 23, 2025
    गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. यापुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला .

    अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनास आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले.

    या अंतर्गत सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

    सह आयुक्त (अन्न), सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची तपासणी करावी. तसेच त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी व प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बंदीबाबत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

    0000

    किरण वाघ/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed