पेण नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राजकीय चित्र स्पष्ट झालं आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत नेमकं काय घडलं आणि सत्तासमीकरण कसं ठरलं?
या निवडणुकीत 12 प्रभागांतून 24 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष निवडले गेले. भाजप–राष्ट्रवादी महायुतीने 17 नगरसेवकांसह नगराध्यक्षपदीही आपले वर्चस्व कायम ठेवले, तर “नगरविकास आघाडी”ला 3, “आम्ही पेणकर आघाडी”ला 2, शिवसेना (UBT) आणि शिवसेना शिंदे गटाला 1 जागा मिळाली आहे. प्रभाग 8-अ मधील जास्वीन पाटील यांनी 791 मतांनी सर्वाधिक आघाडी घेत विजय संपादन केला आहे.
Local Election Result: पराभवानंतर महाविकास आघाडीत भूकंप; काँग्रेसने भाजपची बी टीम म्हणून काम केले, रोहित पवारांचा गंभीर आरोप
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली. निवडणूकपूर्व राजकीय तापमान, आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक लक्षात घेता मतदानाचा दिवस पेणकरांसाठी शांततेचा होता. प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे अंतिम निकालापर्यंत कोणत्याही प्रकारची अराजकता घडली नाही. काही प्रभागांत बिनविरोध उमेदवार निवडून आले, तर 17 नगरसेवकांचे अर्ज छाननीत बाद झाले.
नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या विजयामुळे महायुतीची पकड नगरपरिषदेवर अधिक दृढ झाली आहे. भाजप विरोधी आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून, नगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये महायुतीसाठी मोठा फायदा झाला आहे. या निकालातून स्पष्ट झाले की पेणकर नागरिक महायुतीच्या नेतृत्वावर ठामपणे विश्वास ठेवून आहेत.
महायुतीच्या विजयामुळे नगरपालिकेत विकास, मूलभूत सुविधा आणि नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. प्रीतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुढील काळात नगरपालिकेत ठोस कामगिरी करत विरोधी पक्षांसाठी आव्हान ठरणार आहे.
