Baramati Election News: बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आज एका मतदान केंद्राजवळ धक्कादायक प्रकार उघडकीस आला. उमेदवाराच्या मतपत्रिकेवर नारळ, लिंबू आणि भात ठेवून उतारा टाकल्याचं दिसून आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत घडलेली ही घटना चर्चेचा विषय ठरली.
बारामतीतील आमराई परिसरात प्रभाग 14 मधील मतदान केंद्राजवळ एका उमेदवाराच्या बूथपासून थोड्या अंतरावर नारळ, लिंबू आणि भात ठेवून उतारा टाकलेला आढळला. विशेष म्हणजे, या उतारावर उमेदवाराच्या मतपत्रिकेच्या आवाहन पत्रिकेवर भात, नारळ आणि लिंबू ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे बारामतीत मोठी खळबळ उडाली असून, समाज अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी, काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याने, उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. याच दरम्यान, आमराई परिसरातील प्रभाग 14 मध्ये लक्षवेधी लढत असल्याने, या ठिकाणी अघोरी विद्येचा प्रयोग झाल्याचे समोर आले.
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, काल अमावस्या असल्याने हा उतारा टाकलेला असावा, अशी शंका काही जणांनी व्यक्त केली. तर काहींनी मात्र उमेदवाराच्या पत्रिकेवर हा उतारा का ठेवला, असा प्रश्न उपस्थित करत याला अघोरी प्रकार म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बारामतीत बराच काळ चर्चा सुरू राहिली. ग्रामीण भागात आजही तंत्र-मंत्र, अघोरी विद्या आणि भूताखेतावरचे उतारे टाकण्याची प्रथा असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
